उत्तरमांड मध्यम प्रकल्पग्रस्तांनी विविध मागण्यांसाठी माजगाव (ता. पाटण) येथे ‘रास्ता रोको’  आंदोलन करण्याची घेतलेली भूमिका पोलिसांचा हस्तक्षेप आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनामुळे तूर्तास मागे घेण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील, तालुकाध्यक्ष पंढरीनाथ एकावडे यांच्यासह शेकडो प्रकल्पग्रस्त आंदोलनस्थळी उपस्थित होते.
उत्तरमांड मध्यम प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्या अजूनही जैसे थे आहेत. अठरा नागरी सुविधांच्या अपूर्ततेमुळे धरणग्रस्तांपुढे समस्यांचा डोंगर उभा आहे. असे असतानाच या प्रकल्पातील माथणेवाडी गावातील पंधरा कुटुंबांना संपादित प्लॉटमध्ये घरे बांधण्यास अडथळा निर्माण केला जात असल्याबद्दल तसेच विविध मागण्यांसाठी रास्ता रोको करण्याचा इशारा धरणग्रस्तांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता. त्यानुसार माजगाव गावठाण येथे प्रकल्पग्रस्त एकत्रित आले. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील, तालुकाध्यक्ष पंढरीनाथ एकावडे हे आंदोलनस्थळी आल्यावर चाफळ-उंब्रज रस्त्यावर आंदोलनाला प्रारंभ करताच उंब्रज  पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांनी रस्त्यावर बसलेल्या धरणग्रस्तांना विनंती करून बाजूला केले. चोख पोलीस बंदोबस्तामुळे आंदोलनकर्त्यां धरणग्रस्तांना काही मिनिटेच रास्ता रोको करणे शक्य झाले. अरूण देवकर यांनी धरणग्रस्त व नायब तहसीलदार डी. बी. शिरसट, कृष्णा खोरेचे उपअभियंत्यांमध्ये चर्चा घडवून आणत आंदोलन थांबविण्याची विनंती केली.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी प्रांताधिकारी संजय तेली यांच्याशी संपर्क साधून चर्चा केल्यानंतर व अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन थांबविण्याचे ठरविले. दरम्यान, जिल्हा पुनर्वसन कार्यालयात प्रांताधिकारी व संबंधित विभागाचे सर्व अधिकाऱ्यांची धरणग्रस्तांबरोबर बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीत योग्य तोडगा न निघाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात उत्तम माथणे, शिवाजी जाधव, गोरखनाथ साळुंखे, दिलीप मोहिते, जगन्नाथ बोंगाळे, बाळकृष्ण गायकवाड, अभिजित माथणे, बापूराव पवार, दिलीप गायकवाड, अरूण पाटील, महादेव पाटील, यशवंत पाटील, बाळकृष्ण माथणे, खाशीबाई फडतरे, यशोदा गायकवाड यांच्यासह धरणग्रस्त सहभागी झाले होते. 

Story img Loader