वडगावशेरी मतदारसंघाच्या पाण्याबाबत स्थानिक आमदार आणि काँग्रेस यांच्यात चांगलाच वाद निर्माण झाला असून वडगावशेरी मतदारसंघ टँकरमुक्त करा, अशी मागणी माजी आमदार चंद्रकात छाजेड यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. मतदारसंघातील इतरही अनेक समस्यांबाबत छाजेड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
वडगावशेरी मतदारसंघातील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी छाजेड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. राजेंद्र शिरसाट, रमेश सकट, शंकर राठोड आदी यावेळी उपस्थित होते. मतदारसंघातील पाणीपुरवठय़ाबाबत अनेक तक्रारी असून आमचा मतदारसंघ टँकरमुक्त करा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. तर या मतदारसंघात सर्व भागात पाणीपुरवठा चांगला असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे.
येरवडा भागात केंद्र सरकारच्या मदतीने गरिबांसाठी घरे ही योजना तीन वर्षांपूर्वी हाती घेण्यात आली. त्यासाठी शेकडो कुटुंबाची राहती घरे पाडण्यात आली आणि आता ही योजनाच ठप्प झाली आहे. या कुटुंबांना भाडय़ाने घरे घेऊन राहावे लागत आहे आणि सर्वसामान्य कुटुंबांना ते परवडत नाही. त्यामुळे या योजनेची अर्धवट कामे तातडीने पूर्ण करावीत, अशीही मागणी काँग्रेसने केली आहे.
वडगावशेरी येथे पथारीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी मोठा बाजार बांधण्यात आला असला, तरी गेल्या पाच वर्षांपासून त्यातील गाळ्यांचे वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे पथारीवाल्यांचा प्रश्न सुटलेला नाही तसेच लोकांनाही चांगले मार्केट उपलब्ध नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पथारीवाल्यांचे हे रखडलेले पुनर्वसन तातडीने मार्गी लावावे अशीही मागणी करण्यात आली आहे. विश्रांतवाडी येथील भाजी मंडईचा आणि वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी तेथे उड्डाणपुलाचे नियोजन करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. लोहगाव येथे कारगील युद्धातील सैनिकांची वसाहत असून त्या वसाहतीतून विकास आराखडय़ातील रस्ता दर्शविण्यात आला आहे. हा रस्ता त्वरित रद्द करावा आणि तो महापालिका हद्दीतून आखण्यात यावा, अशीही मागणी आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा