जिल्ह्य़ातील दारिद्रय़रेषेखालील शिधाधारकांना साखरपुरवठा करणे अवघड बनले आहे. अहमदनगर जिल्ह्य़ातील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याने गेल्या ३ महिन्यांपासून १ हजार ५४५ क्विंटल साखर स्वस्त धान्य दुकानदारांना उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे वैजापूर व पैठण तालुक्यांतील शिधाधारक साखरेपासून वंचित राहणार आहेत. या कारखान्याचे नियतन बदलून द्यावेत अन्यथा कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी उपायुक्तांकडे केली.
दारिद्रय़रेषेखालील कार्डधारकांना प्रतिव्यक्ती ५०० ग्रॅम साखर स्वस्त धान्य दुकानातून देण्यासाठी कोटा मंजूर केला जातो. जिल्ह्य़ात ५ हजार ८१३ क्विंटल साखरेचे नियतन वेगवेगळ्या साखर कारखान्यांना ठरवून देण्यात आले. केंद्र सरकारकडून कोणत्या कारखान्याने किती साखर वितरित करायची, याचे प्रमाण ठरवून दिले जाते. साखर वाहतुकीसाठी ठेकेदारही नेमले आहेत. त्यांनी प्रत्येक कारखान्याकडून साखर उचल करावी, असे आदेश दिले जातात. वैजापूर तालुक्यासाठी सुनील काकडे या ठेकेदाराने जानेवारीकरिता २ लाख ९९ हजार ८८४ रुपये भरले. ५१५ क्विंटल साखरेची रक्कम भरल्यानंतरही साखर उचल करता आली नाही. एम.एस.सी. बँकेने साखर कारखान्याचे गोदाम सील केले असल्याने साखर देण्यास कारखाना प्रशासनाने असमर्थता दर्शविली. परिणामी औरंगाबाद जिल्ह्य़ातील पैठण व वैजापूर या दोन तालुक्यांत साखर वितरित होण्यास अडचण निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaijapur paithan rationcard holder will be deprived from sugar