वैनगंगा नदीच्या प्रदूषणास मुख्यत: नाग नदीचा प्रवाह कारणीभूत आहे. हे प्रदूषित पाणी कन्हान नदीच्या माध्यमातून वैनगंगा नदीत येते आणि गोसेखुर्द प्रकल्पामुळे ते पाणी इंदिरा सागर जलाशयात, तीन वर्षांपासून अडविले गेले आहे. तीन वर्षांपूर्वी वैनगंगा, कन्हान यांच्या वाहत्या पाण्यामुळे हे घाण पाण्याचे संकट जाणवत नव्हते, परंतु आता ते जाणवू लागले आहे.
‘नीरी’ या संस्थेने या जलप्रदूषणाचा अभ्यास केला. प्रदूषणास नागनदीचा प्रवाह कारणीभूत असल्याचा निष्कर्ष नीरीने काढला आहे. या प्रदूषणाचे पालकत्व अर्थात, नागपूर महानगरपालिकेकडे येते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात हा विषय गेला असता न्यायालयाने नागनदीच्या शुद्धीकरणाची योजना सादर करण्यास सांगितले. चार ट्रिटमेंट प्लॉंटच्या माध्यमातून नागनदीचे पाणी शुद्ध केल्यानंतर पुढे सोडायचे, अशी योजना होती,
परंतु अजून कोणतीच कार्यवाही झाली नाही. शासनदेखील वैनगंगेच्या काठावरील लोकांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे डोळेझाक करीत आहे. आता या प्रदूषणाचे संकट सहन करणाऱ्यांना गोसेखुर्द धरण एक भयंकर शाप वाटत आहे.
वैनगंगा नदीकाठावरील गावांमध्ये कावीळ, तसेच अन्य आजार मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. सर्वच प्राथमिक आरोग्य केन्द्रे, तसेच ग्रामपंचायतींनी या संबंधात लेखी अहवाल प्रशासनाला सादर केले आहेत.
श्री क्षेत्र आंभोरा, पंचनद्यांच्या संगमामुळे, तसेच मराठीचा
आद्यग्रंथ ‘विवेकसिंधु’मुळे सर्वत्र प्रसिद्ध आहे. ते एक उत्तम पर्यटनस्थळ आहे, परंतु नदीचे पाणी येथे प्रवाह अडल्यामुळे साचून पाण्याला दरुगधी येत आहे. पाण्याचा रंगही बदलला आहे. कित्येक किलोमीटर परिसरातील नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे.
या जलप्रदूषणामुळे जिल्ह्य़ातील सौंदड, पाथरी, मालची, सावरगाव आणि इटगाव ही गावे मोठय़ा प्रमाणात प्रभावित झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पवनीला देखील या प्रदूषित पाण्याचा फटका बसला आहे. या विरोधात सतत जनआंदोलने होऊनही कुठेच दखल घेतली जात नाही. त्यामुळे माजी आयकर आयुक्त धनंजय धार्मिक यांच्या धार्मिक फाऊंडेशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याबाबत जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयालाही महानगरपालिका व शासन दाद देत नाही. सरळ चालढकल करीत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा