भगवान महावीर स्मारक समितीतर्फे बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्य़ातील वैशाली या भगवान महावीर यांच्या जन्मभूमीत भव्य मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये जैन समाजाबरोबरच अहिंसा हे तत्त्व मानणाऱ्या नागरिकांनी मंदिराच्या उभारणीमध्ये एका विटेचे योगदान द्यावे यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. समितीच्या अर्थव्यवस्था समितीचे अध्यक्ष सतीश चंद्र जैन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी जैन सहयोग संस्थेचे मिलिंद फडे, डॉ. वीरकुमार जैन आणि सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे डॉ. कल्याण गंगवाल उपस्थित होते.  सतीश चंद्र जैन म्हणाले, वैशाली ही जैन धर्माचे २४ वे र्तीथकर वर्धमान महावीर यांची जन्मभूमी आहे. येथे १९५५ मध्ये प्राकृत, जैन शास्त्र आणि अहिंसा शोध संस्थान ही संशोधन संस्था सुरू करण्यात आली. पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २३ एप्रिल १९५६ रोजी भगवान महावीर स्मारकाची पायाभरणी केली. आता येथे जैन आचार्य विद्यानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मंदिर साकारण्यात येणार आहे. या मंदिरामध्ये संग्रहालय, वाचनालय, महाविद्यालय, रुग्णालय, भोजनालय आणि सभागृह अशा सुविधा देण्यात येणार आहेत.