काल आतला आवाज खूप काही सांगत होता. पण आज काही विशेष असे घडले नाही. त्यामुळे आजच्या आवाजाची बोलती जरा बंदच झाली. नेहमीप्रमाणे मी बसमध्ये चढलो. ‘ती’ समोर बसलीच होती. पण तिनं माझ्याकडे वळून पाहावे असं काहीच घडलं नाही. वाटलं की पुन्हा एकदा महिलांच्या सीटजवळ रेंगाळत राहवे आणि कंडक्टर काकांचा ओरडा खावा. पण तसं करणं धोकादायकपण आहे. मग बेत रद्द केला. ती नियमितपणे तिच्या स्टॉपवर उतरली आणि तिच्या मागून मीपण उतरलो. मग नेहमीप्रमाणे ती तिच्या मार्गाला आणि मी माझ्या मार्गाला. पण एक गोष्ट घडली. त्याचा उपयोग किती होईल माहिती नाही. झालाच तर लॉटरी लागेल. तिनं आज एका मुलाला हाय केला. तो माझ्या ओळखीचा आहे. त्याच्याकडून तिचा फोननंबर मिळवण्याचा प्रयत्न आता केला पाहिजे. उद्या त्याच्याकडून नंबर मिळवलाच पाहिजे. एकदा नंबर मिळाला की माझे काम होणारच. पण या पोराचे नाव काय आठवत नाहीए. शाळेत होता ‘अ’ वर्गातला हुशार किडा होता तो एवढं मात्र आठवतयं. आमच्या वर्गाची ‘अ’ वर्गाशी खुन्नस होती. त्याच्याकडे नंबर असला म्हणजे मिळवलं. शक्यता कमीच वाटतेयं. ही पोरं काही पोरींच्या लफडय़ात पडायची नाहीत. उगाचच मनातल्या मनात नको ते विचार करण्यापेक्षा प्रयत्न करायला काय हरकत आहे. उद्या गाठतोच याला. थोडेफार प्रयत्न दुसरीकडूनही व्हायला हवेत. फेसबुक ट्विटरवरून तिला धुंडाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चला कामाला लागूयात. फेसबुक सुरू करूयात. ‘प्रयत्नांती परमेश्वर. नाही तर जग आहे नश्वर.’