प्रेमाची भाषा जगभरात एकच असते. प्रेमाचा वसंत ऋतुसुद्धा एकच असतो. कोणी या ऋतुला ‘वसंतपंचमी’ म्हणतो कुणी ‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणतो. प्रत्येक तरुण- तरुणीच्या मनातील विचार व्यक्त करणारी ‘नाथा कामत’ची डायरी आजच्या वसंतपंचमीपासून पुढील आठवडय़ात येणाऱ्या व्हॅलेंटाइन डेपर्यंत रोज..
बस चुकली
आई शप्पथ वाट लागली.. आज बस हमखास चुकणार. काल रात्री उगाचच असाइनमेंट पूर्ण करत बसलो. ती राहिली असती तर एक वेळ सरांचा ओरडा खाणं परवडलं असतं. पण बस चुकली म्हणजे आजचा दिवस वाईट जाणार. असाइनमेंट पूर्ण केली तरी ओरडा पडणारच आहे. काय आहे ना, असा एखादा चेहरा असतो जो सकाळी सकाळी दिसला की तुमचा दिवस एकदम झक्कास जातो. माझ्या आयुष्यातही असा एक चेहरा आहे. रोज सकाळी बसमध्ये तो मला दिसला की दिवस झक्कास गेलाच म्हणून समजा. परवा ‘ती’ बसमध्ये नव्हती तर कॉलेजमधल्या भाई बिरास्तेकडून फुकटंफाकट मार खावा लागला होता. आज पण बट्टय़ाबोळ होणार. ‘सुंदर’, ‘शालीन’ या उपमा फिक्या पडतील इतकं सौंदर्य तिला देवाने दिलंय. आईछप्पथ यार, ती दिसली की आयुष्य इथच ‘स्टॅच्यू’ व्हावं असं वाटतं. तिच्यासाठी रोज दोन स्टॉप पुढे गेल्यावर त्याच स्टॉपवर दिवसभर बसून राहावं असंही वाटतं. पण काय करणार, ‘ब्लॅकलिस्ट’च्या भीतीपोटी पुन्हा कॉलेजला यावं लागतं. काल तिनं मान उंचावून मला पाहिलं होतं. आता हिंमत करून तिच्याशी बोललचं पाहिजे. येत्या ‘व्हॅलेंटाइन डे’ला तिला लाल गुलाब द्यायचा आहे ना. त्यामुळे बसच्या बाहेरच्या भेटी थोडय़ा वाढल्या पाहिजेत. उद्यापासून बस चुकून चालणार नाही. आत्ताच उद्या सकाळी ८.३० चा गजर लावून ठेवतो.
नाथा कामत
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा