हुश्श.. नंबर मिळवला. त्याने फार कटकट केली नाही म्हणून बरे झाले. पण आता दुसरा वांदा झालाय. तिला फोन किंवा मेसेज कसा करायचा हा प्रश्न आहे आता. नंबर मिळवण्यासाठी जेवढी धडपड केली त्यापेक्षा जास्त धडधड आता होतेय. नंबर मिळाल्यापासून १० वेळा ‘व्हॉटस अ‍ॅप’वर ‘हाय’ लिहिलं. पण पाठवायची हिंमत होत नाहीए. तसं मी घाबरत नाही कुणाला. पण माझं हे वागणं तिला आवडलं नाही तर मागे वळून बघायची पण बंद होईल, ही भीती मनाला मागे ओढते आहे. सध्या किमान नजर तरी देतेय. तेही बंद होईल. काय करू. सुचतच नव्हतं. अखेर पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत शरीरातील सर्व शक्ती एकवटली आणि हिंमत करून दुपारी ‘व्हॉटस अ‍ॅप’वर ‘हाय’ पाठवला. रात्र झाली तरी काही उत्तर आले नाही. तिला नक्कीच आवडलं नसेल. आता उद्यापासून माझ्याकडे बघणेपण बंद होणार म्हणजे. उगाचच पाठवलं ‘हाय’. तिनं इम्प्रेस व्हावं म्हणून ‘व्हॉटस अ‍ॅप’चा डीपीपण बदलला आणि एक एकदम चिकनाचुपडा फोटो पण अपलोड केला. तरीही उत्तर आलं नाही. असो, वाट पाहण्यापलीकडे काय आहे. पण उद्या एका स्पध्रेच्या निमित्ताने तिच्या कॉलेजमध्ये जायचं आहे. आता तयारीला लागतो. कपडय़ांना इस्त्रीपण करायची आहे आणि पेटीचा सरावपण करायचा आहे. वेळ खूपच कमी आहे.
नाथा कामत