‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यासाठी तरुण व तरुणी सज्ज झालेले असतानाच या दिवसाचे समर्थन आणि विरोध करणारेही सरसावले आहेत. हुल्लडबाजी आणि प्रेमाच्या नावावर विकृती होत असेल तर त्याला विरोध करण्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भारतीय जनता युवा मोर्चा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून त्याला विरोध करणार आहे.
‘व्हॅलेंटाईन डे’ला विरोध करण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे गोरक्षण सभेतून ‘इशारा मिरवणूक’ काढण्यात आली. दीक्षाभूमी, लक्ष्मीनगर, शंकरनगर, लॉ कॉलेज, फुटाळा तलाव, जीपीओ चौक, महाराजबाग, व्हरायटी चौक या मार्गाने फिरून आलेल्या या मिरवणुकीचा समारोप  सीताबर्डीतील मुंजे चौकात झाला. ‘व्हॅलेंटाईन डे’ला तरुण व तरुणी रस्त्यावर किंवा उद्यानात फिरताना दिसल्यास त्यांच्यावर परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची करडी नजर राहणार आहे. अतिउत्साही तरुण-तरुणींना विवाह बंधनात अडकवण्यासाठी दलाने तयारी केली आहे. यासाठी बजरंग दलाची चार पथके आणि दोन पुरोहित पूर्ण तयारीत राहणार आहेत. विवाह सोहोळ्यास लागणारे साहित्य ते सोबत ठेवणार आहेत. बजरंग दलाचे विदर्भ प्रमुख सुबोध आचार्य म्हणाले, पाश्चात्य संस्कृतीचे लांगुलचालन करण्याला विरोध करणे गरजेचे आहे. प्रेमाच्या नावाखाली शहरातील विविध भागात हुल्लडबाजी आणि विकृती होत असेल तर आमचा त्याला विरोध राहील. दुकानातील वस्तू विकण्यासाठी अशा दिवसाचे व्यापारीकरण करण्याऱ्या प्रवृत्ती प्रबळ होत आहेत. जग सर्वासाठी आहे आणि सर्व प्राणीमात्रांना जगण्याचा समान अधिकार असल्याचे भारतीय संस्कृती सांगते. आज मात्र, सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न होताना दिसून येतो. सर्व नागरिकांनी त्यांच्या परिसरातील तरुण व तरुणींना अशा अपप्रवृत्तींपासून सावध करावे, असे आवाहनही बजरंगदलातर्फे करण्यात आले आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे विदर्भ विभागीय संघटक हेमंत गडकरी म्हणाले, प्रेम करण्यास आमचा विरोध नाही मात्र प्रेम करण्याच्या नावावर जी हुल्लडबाजी आणि त्याला विकृतीचे स्वरूप येते त्याला विरोध राहील. मनसेचे कार्यकर्ते या विकृतीला विरोध करतील. उद्यांनामध्ये किंवा तलावाच्या ठिकाणी अनेक ज्येष्ठ मंडळी फिरायला जात असताना त्या ठिकाणी अश्लील प्रकार घडत असतील तर त्याला आम्ही विरोध करणार असल्याचे गडकरी म्हणाले.  
दुसरीकडे व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्यांना अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तरुण व तरुणींना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रप्रेमी युवा दलाचे बाबा मेंढे यांनी केली आहे. हुल्लडबाजी खपवून घेणार नाही, असा इशारा देऊन भाजयुमोचे शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यास विरोध दर्शविला आहे. राष्ट्रप्रेमी युवा दल आणि विदर्भ युथ कौन्सिलने तरुणांचा उत्साह वाढविण्यासाठी दिनाचे समर्थन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा