करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरातील मौल्यवान दागिन्यांच्या मूल्यांकनास मंगळवारपासून पुनश्च सुरुवात झाली. गेले ९ महिने थांबलेले काम नव्याने सुरू झाले असून ते निश्चित किती काळ सुरू राहणार याची स्पष्टता करण्यात आलेली नाही. पहिल्या दिवशी २० लाख ७४ हजार किमतीच्या दागिन्यांची मोजदाद करण्यात आली. पुरुषोत्तम काळे व कोल्हापूर सराफ असोसिएशन यांच्या वतीने मूल्यांकनाचे काम सुरू झाले आहे.    
महालक्ष्मी मंदिरातील दागिन्यांची मोजदाद करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने होत होती. गतवर्षी ८ जून रोजी या कामाला पुरुषोत्तम काळे यांनी सुरुवात केली. पाच दिवस हे काम सुरू राहिल्यानंतर काळे यांना काही अडचणी आल्यामुळे काम प्रलंबित राहिले होते. या कामाला आता मंगळवारपासून सुरुवात झाली.    कडेकोट बंदोबस्तामध्ये दागिन्यांची मोजदाद सुरू झाली. पहिला दिवस असल्यामुळे काम सुरू होण्यास दुपारचे दीड वाजले होते. सुमारे साडेतीन तास मूल्यांकनाचे काम सुरू होते. नवस, देणगी स्वरूपात देवीला अर्पण करण्यात आलेले किरीट, मंगळसूत्र, बांगडय़ा, वळे आदी विविध स्वरूपातील तीन कापडी गठ्ठय़ात ठेवण्यात आलेल्या १३५ दागिन्यांचे मूल्यांकन करण्यात आले. त्याची किंमत २० लाख ७४ हजार रुपये होती.    
या वेळी निवासी जिल्हाधिकारी संजय पवार, देवस्थान समितीचे खजिनदार बाळासाहेब कुपेकर, सदस्या पद्मजा तिवले, हिरोजी परब, शिवाजी साळवी, धनाजी जाधव, प्रल्हाद सावंत, महादेव खांडेकर, निवास चव्हाण, सराफ असोसिएशनचे सत्यजित सागावकर, सुनील जाधव, अशोक झाड, पोलीस निरीक्षक यशवंत केडगे, अंकुश निकम आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Valuation of ornaments of mahalaxmi temple
Show comments