साहित्य हे मूल्यसंवर्धनाचा स्त्रोत आहे. मूल्यात्मकतेची जाणीव प्रगट करणारे साहित्यच प्रभावी ठरते आणि ते चिरकाल टिकून रहाते. मानवी समाजात मूल्यात्मकता विकसित करण्यासाठी विविध परिसरातील छोटी-मोठी साहित्य संमेलने महत्वाची आहेत. ते नव्या जाणीवा आणि मूल्यांची रुजवण करतात. किंबहुना तसा प्रयत्न जाणीवपूर्वक करायला हवा, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी केले. तळोदा येथे नंदुरबार जिल्हा पाचव्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. साहित्य संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद रंगले तसेच काव्य संमेलनात दुष्काळ, पाणी टंचाई, भ्रुणहत्या आदी ज्वलंत विषयांवर काव्यात्मक पद्धतीने प्रकाशझोत टाकण्यात आला.
नंदुरबार जिल्हा साहित्य अकादमी, आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी यांच्यातर्फे तळोदा येथील माळी समाज मंगल कार्यालयाच्या प्रांगणात या जिल्हा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षा म्हणून डॉ. सुरेखा बनकर तर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक डॉ. पितांबर सरोदे, प्रा. डॉ. विश्वास पाटील, वाहरू सोनवणे, जयाबाई गावित, प्रा. दत्ता वाघ आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. कोतापल्ले यांनी अक्षरे व शब्द मूल्यांचे तोफगोळे असतात. त्यातून परिसरातील सर्व समाजाकडे शब्दरूपी मूल्ये पोहचवून त्यांच्या जाणीवा समृद्ध करून माणूसपण जगवा, असे आवाहन केले. महाराष्ट्रात विविध स्तरावर सुमारे १४६ साहित्य संमेलने होतात. ही गोष्ट कौतुकास्पद आहे. त्यामधून परिसरातील विचारधन प्रगट होते. मानवी मूल्य निर्माण करणारे साहित्य हवे. भाषा हे शोषणाचे अत्याचाराचे माध्यम बनू शकते. आजही न्यायालयात न्यायदानाची भाषा इंग्रजी आहे. परिणामी, न्यायासाठी लढणारे अशिक्षित, अल्पशिक्षित इंग्रजी न समजणाऱ्या मागास समाजाच्या जाती-जमातीचे शोषण होताना दिसत आहे. सर्वाना समजणारी अशी न्यायदानाची भाषा असली पाहिजे, असेही डॉ. कोत्तापल्ले यांनी सांगितले. संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा बनकर यांनी ज्यातून जनहित साधले जाते, तेच खरे साहित्य असल्याचे सांगितले. वाचन संस्कृती लोप पावत असल्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली. स्वागताध्यक्ष राजेंद्र गावित यांनी समाजसंहिता अधिक समृद्ध करण्यासाठी समाज प्रबोधन करण्यासाठी, लोकजीवनाची नैतिक मूल्ये दृढ करण्यासाठी साहित्य संमेलनाची गरज असल्याचे नमूद केले. संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद रंगले. नंदुरबार जिल्ह्यातील बोलीभाषांचे साहित्यातील स्थान या विषयावरील परिसंवादात अहिराणी भाषेचे पैलू व त्यातील गोडवा विविध उदाहरणांसह मांडण्यात आला. लोकसंघर्षच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ‘शासनाचे मराठी धोरण २०१३’ हा परिसंवादही उत्कट ठरला. शासन धोरण ठरविते, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी होत नाही, हे परखड शब्दात मांडण्यात आले. अंतिम सत्रातील काव्य संमेलनात ५० कवींनी सहभाग नोंदविला होता. भृणहत्या, अत्याचार, आई-वडील, प्रेम, विरह, दुष्काळ, पाणी टंचाई आदी विषयांवरील विविध रंग काव्य संमेलनात दिसले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा