शाळेत व शाळेतून घरी नेताना व्हॅन्स व ऑटोरिक्षांमध्ये मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बसवून जीवघेणा खेळ खेळला जात असून तो थांबवणार तरी केव्हा? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.
बहुतेक शाळांनी विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी बसेस ठेवल्या आहेत. मात्र, ज्यांना हे शक्य नाही असे अनेक पालक व्हॅन व ऑटोरिक्षातून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवितात. ऑटो रिक्षांपेक्षा व्हॅन्सची संख्या वाढली आहे. काही व्हॅन्स चालकांशी शाळांनी करार केले आहेत. असा करार न करणाऱ्या व्हॅन्सची संख्याही मोठी आहे. मात्र, अपवाद वगळता अनेक व्हॅन्समधून प्रत्यक्षात विद्यार्थी कोंबलेले असल्याचे चित्र शहरात रोजच दिसते. दफ्तरे असल्याने विद्यार्थ्यांंना वाहनामध्ये हालचालही करता येत नाही. अनेक व्हॅन्समधून परवानगी नसतानाही त्यात विद्यार्थ्यांची ने-आण होते. विद्यार्थ्यांना दाटीवाटीने बसवलेले असते, अनेक व्हॅन्समध्ये अवैध गॅस सिलिंडर्स लावलेले असतात.
ही कल्पना नसून वास्तव आहे. सेमिनरी हिल्स, सिव्हिल लाईन्स, धरमपेठ, सक्करदरा, मेडिकल चौक, महाल, गांधीबाग, सदरसह शहरातील कुठल्याही भागात, शाळांसमोर किंवा रस्त्याने जाणाऱ्या व्हॅन्समध्ये कुणालाही हे दिसेल. शहराच्या मुख्य मार्गावरून ही प्रवासी वाहतूक होते. चौकाचौकात वाहतूक ‘नियंत्रित’ करण्यासाठी उभे असलेल्या वाहतूक पोलिसांसमक्ष ही वाहतूक केली जाते. हे माहिती असूनही वाहतूक पोलीस गांभिर्याने कारवाई करीत नाहीत. वाहतूक पोलिसांनी १६ जानेवारीला शहरात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतुकीसंदर्भात ५७ प्रकरणे नोंदवली. मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी नेणाऱ्या वाहनांवर कारवाई होत असली तरी ती नगण्यच, थातूरमातूर असल्याचे स्पष्ट होते. कारवाई होऊनही पुन्हा ही वाहने रस्त्यावर धावतात, यामागील कारणेही सर्वसामान्यांना माहिती आहेत. पोलिसांच्या आशीर्वादाने हे सर्व सुरू असते, याची जाणीवही जनतेला आहे.
मर्यादेपेक्षा जास्त वाहतूक कोणतीही असो ती घातकच आहे. पालकही यास तितकेच जबाबदार आहेत. शाळांशी करार न झालेल्या वाहनांमधून ते त्यांच्या पाल्यांना पाठवून जीवघेणी जोखीम घेत आहेत. पाल्य ज्या वाहनात जातो त्यात किती विद्यार्थी बसवले जातात, याची खात्रीदेखील ते करीत नाहीत. तर व्हॅनचालक चार पैसे कमाविण्याच्या नादात स्वत:च्या व विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असतात. शासनाच्या मोटार परिवहन विभागाने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी नवे धोरण तयार केले आहे. मात्र, त्यातील तरतुदींचे पालन नियमानुसार होत आहे अथवा नाही, यासाठी प्रत्येक शाळेत एक समिती तयार करण्यात आली आहे. त्यात शालेय संस्था, मुख्याध्यापक, पालक, वाहतूक पोलीस व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा समावेश असतो. ही समितीही कुंभकर्णी झोपेत आहे. अपघाताची शक्यता लक्षात घेता सर्वानीच विशेषत: वाहन चालक वा मालक तसेच पालकांनीही काळजी घ्यावयास हवी. वाहन चालकांनी रोजगार जरूर करावा. मात्र, नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी, असे सर्वसामान्य नागरिकांना वाटते.

Story img Loader