विविध कला हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे, त्याला व्यासपीठ मिळावे हाच हेतू सांस्कृतिक महोत्सवाच्या आयोजनामागे सरकारचा आहे, जिल्हय़ाच्या ठिकाणीच नाही तर तालुका स्तरावरही असेच महोत्सव आयोजित झाले पाहिजेत, असे पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी सांगितले.
पाचपुते यांच्या हस्ते आज यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात जिल्हा सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन झाले. महोत्सवाचे स्वागताध्यक्ष मधुसूदन मुळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा पुरवठा अधिकारी सोपानराव कासार, महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी अजय मोरे, नाटय़ परिषद नगर शाखेचे निनाद बेडेकर, शेवगाव नाटय़ परिषदेचे भगवान राऊत, सप्तरंग थिएटरचे अध्यक्ष श्याम शिंदे आदी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
‘महोत्सवाला गर्दी कमी आहे, पुढच्या वेळी आम्हाला थोडे आधी सांगा, जागा कमी पडेल अशी व्यवस्था करू’ असे म्हणत पाचपुते यांनी संयोजक असलेल्या जिल्हा प्रशासनाला थोडी कोपरखळी मारली. निधी कमी आहे, तो पुढील वेळी वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. स्वागताध्यक्ष मुळे यांनी जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न प्रामाणिक होता, पण सरकारी कार्यक्रम म्हणजे काहीतरी रटाळ असणार असे समीकरण तयार झाले असल्याचा हा परिणाम आहे असे सांगितले. अतिरिक्त जिल्हाधिकारी जगताप यांनी ‘सुरुवात अशीच होत असते, नंतर मात्र जागा शिल्लक राहणार नाही व हा महोत्सव जिल्हय़ातील सांस्कृतिक क्षेत्रातील मानाचे पान होईल’ अशी आशा व्यक्त केली.
राऊत, बेडेकर यांचीही भाषणे झाली. पाचपुते यांच्या हस्ते नटराजपूजन करून महोत्सवाला सुरुवात झाली. गणेश वंदनेनंतर श्रद्धा रेखी यांनी गौळण व धीरज महाराज शर्मा (राशिन) यांनी कीर्तन सादर केले. मोहनीराज गटणे यांनी सूत्रसंचालन केले. राऊत यांनी आभार मानले.
यथातथाच प्रतिसाद
सकाळी साडेदहा वाजता होणारे उद्घाटन थेट दुपारी १२ वाजता झाले. त्याही वेळी सभागृहात अवघ्या शंभरएक प्रेक्षकांची उपस्थिती होती. त्यातही अनेक सरकारी कर्मचारीच होते. संयोजक मोरे यांनी राष्ट्रीय पाठशाळेतील काही विद्यार्थ्यांना बोलावून सभागृहात आणले. रिक्षातून गेले ४ दिवस प्रचार केला जात होता, पत्रके वाटण्यात आली होती असे त्यांनी सांगितले. मात्र तरीही उद्घाटनाचा कार्यक्रम मंत्र्यांच्या उपस्थितीत व्यवस्थितपणे पार पडल्याने ते समाधानी होते. महोत्सव उद्या (दि.२५) व परवा (दि.२६) दिवसभर अनेकविध कार्यक्रम सादर होणार असून २६ ला सायंकाळी समारोप होईल.
 

Story img Loader