सराफ व सुवर्णकारांना संरक्षण देण्यासाठी राज्य शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. त्यांच्या मदतीकरिताच जिल्हास्तरावर दक्षता समिती स्थापित करण्यात आल्या आहेत. आता त्याची व्याप्ती वाढवून त्या तालुका स्तरापर्यंत नेण्यासाठी माझे प्रयत्न राहतील, असे मत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी येथे बोलताना व्यक्त केले.
कोल्हापूर सराफ व्यापारी संघ व कोल्हापूर जिल्हा सराफ संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शाहू सांस्कृतिक हॉलमध्ये सराफ व सुवर्णकारांचा महामेळावा आजपासून सुरू झाला आहे. त्याचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने केल्यानंतर मंत्री पाटील बोलत होते. या निमित्त बाजूला असलेल्या मैदानामध्ये दागिने बनविणाऱ्या मशिनरी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
परंपरागत सराफ व्यवसायाला आधुनिकीकरणाची जोड देण्याची गरज आहे. त्यासाठी सराफांनी नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची गरज आहे, असे नमूद करून सतेज पाटील म्हणाले, भविष्यात या व्यवसायाची प्रगती होण्यासाठी बदललेले तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. त्यादृष्टीने तरुण सराफांनी व्यवसायात समर्पक बदल घडवून आणावा. सराफांकडून अपेक्षा व्यक्त करताना ते म्हणाले, कोटय़वधी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लक्झरी बसने प्रवास करीत असताना चोरीला कसे जातात याचे गौडबंगाल मला गृहराज्यमंत्री असूनही अजून उलगडलेले नाही. विम्यासाठी काही काळेबेरे होते का, अशी शंका बोलावून दाखवित त्यांनी या व्यवहारात पारदर्शकता येण्याची गरज व्यक्त केली.
जी.जे.एफ या सराफाच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हरीश सोनी बडय़ा कंपन्या नव्या तंत्रज्ञानासह या व्यवसायात मोठय़ा प्रमाणात येत आहेत. त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी विकेंद्रित क्षेत्रातील सराफांनीही स्वत:चे व्यवसायात बदल घडवून आणला पाहिजे. यू.बी.एम. या प्रदर्शन आयोजित केलेल्या कंपनीच्या वतीने पंकज शेंडे यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रदर्शनात सोळा कंपन्या सहभागी झाल्या असून त्यांचे ग्रेडिंग, कास्टिंग, फिनिशिंग, प्युरिटी, टेस्टिंग, रिफायनरींग या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान पाहण्याची संधी उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार मनीष जैन, माजी आमदार मालोजीराजे छत्रपतीस नितीन खंडेलवाल आदींनी मनोगते व्यक्त केली. कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष रणजित परमार यांनी स्वागत केले. तर प्रास्ताविकात कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी व्यवसायातील समस्यांची मांडणी केली. धमेंद्र पवार संपादित ‘सुवर्णस्पर्श’ या स्मरणिकेचे तसेच सराफ मार्गदर्शक सूचिचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. चारूदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
सराफांच्या संरक्षणासाठीच्या दक्षता समिती तालुका स्तरापर्यंत नेमण्याचा प्रयत्न – पाटील
सराफ व सुवर्णकारांना संरक्षण देण्यासाठी राज्य शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. त्यांच्या मदतीकरिताच जिल्हास्तरावर दक्षता समिती स्थापित करण्यात आल्या आहेत.
First published on: 14-04-2013 at 01:30 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Various plans for safety for saraf and jewellers satej patil