यंदाच्या संविधान दिनी २६ नोव्हेंबरला रिझव्‍‌र्ह बँक चौकात विविध संघटनांतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सकाळी ८ वाजता हार घालून कार्यक्रमास सुरुवात होईल. सामूहिक संविधान वाचन व संविधानपर समूहगान यावेळी करण्यात येईल. शहरातील विविध भागातून संघटना मिरवणूक काढून चौकात पोहोचणार आहेत. उर्वेला कॉलनी येथील बानाईच्या कार्यालयात हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारने २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून जाहीर केला. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले. मात्र, सरकारी कार्यालयात केवळ संविधान वाचनाखेरीज कुठलाही उपक्रम राबवला जात नाही. एवढेच काय तर सरकारी कार्यालयाच्या दर्शनी भागात अद्यापही संविधान प्रस्तावना लावले गेले नाही. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिकांच्या केंद्रीय कार्यालयातही संविधानाचा प्रस्तावना नाही. म्हणूनच विविध संघटनांनी एकत्र येऊन याकामी पुढाकार घेण्याचे ठरवले आहे. त्यानुसार गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमच्या सोबतीने अनेक संघटना संविधान दिन साजरा करणार आहेत. यावर्षी कार्यक्रमांचे स्वरूप बदलण्यात आले आहे. रिझव्‍‌र्ह बँक चौकाला संविधान चौक म्हणूनच यावर्षीपासून कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. प्रस्तावनेचे सामूहिक वाचन व संविधान गीताचे सामूहिक गान यानंतर पथनाटय़ाचे सादरीकरण होईल.