वेगळ्या प्रकारची/विषयावरची किंवा राज्य-राष्ट्रीय पातळीवर नावाजलेली नाटके मुंबईकर नाटय़प्रेमी व रसिकांना ‘एनसीपीए’ किंवा ‘पृथ्वी थिएटर्स’ येथे पाहायला मिळतात. परंतु ही नाटके ठाणे, डोंबिवली-कल्याण, नवी मुंबई परिसरातील नागरिकांना अभावानेच पाहायला मिळतात. अशी दर्जेदार नाटके या परिससरातील रसिकांना पाहता यावीत, त्यासाठी ठाणे आर्ट गिल्डने पुढाकार घेतला आहे. या संस्थेच्या ‘नाटय़गंध’ या उपक्रमाअंतर्गत अशी नाटके आता पाहायला मिळणार आहेत. या उपक्रमात केवळ मराठी नव्हे तर राज्य व राष्ट्रीय पातळीवर गाजलेली अन्य भाषांमधील नाटके, दीर्घाक, एकांकिका पाहायला मिळू शकतील.
चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव, गिरीश मोहिते, विजू माने, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, अभिनेते उदय सबनीस, मंगेश देसाई, निर्माते अशोक नारकर यांच्या पुढाकाराने ‘ठाणे आर्ट गिल्ड’ची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेतर्फे ‘नाटय़गंध’ या उपक्रमाची सुरुवात नोव्हेंबर महिन्यापासून होत आहे. पुढील वर्षी ऑक्टोबर २०१४ पर्यंत हा उपक्रम सुरू राहणार असून ठाण्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहाच्या मिनी थिएटरमध्ये महिन्यातून एक या नाटकांचा प्रयोग सादर होणार आहे. विशेष म्हणजे राज्य, राष्ट्रीय पातळीवर गाजलेली नाटके, एकांकिका यांचे हे प्रयोग मूळ संचात सादर केले जाणार आहेत.
उपक्रमाचा शुभारंभ येत्या ९ नोव्हेंबर रोजी संजय कृष्णाजी पाटील लिखित ‘लेझीम खेळणारी पोरं’ या दीर्घाकाने होणार आहे. तर २१ डिसेंबर रोजी पुण्याच्या ग्रिप थिएटर्सचे ‘डू अ‍ॅण्ड मी’ हे नाटक सादर होणार आहे. वर्षभरातील बारा नाटकांच्या प्रयोगासाठी पूर्णोत्सव प्रवेशिका तर ज्या कोणाला पूर्णोत्सव प्रवेशिका नको असेल त्यांना एखाद्या नाटकाचे तिकिट काढून प्रयोग पाहता येऊ शकेल.
पूर्णोत्सव प्रवेशपत्रिका िंकंवा तिकिटे नाटय़प्रयोगाआधी चार दिवस काशिनाथ घाणेकर नाटय़गृहावर मिळू शकतील. अधिक माहितीसाठी सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत संस्थेचे सहसचिव शशी करंदीकर यांच्याशी ९७६९९३९०४५ या क्रमांकावर संपर्क साधावा.