तोफेचा एक तुकडा, विदर्भातील दुर्गराज माणिकगडावरचा. आदिअंत नसलेल्या इतिहासाचा एक जिवंत तुकडा. युद्ध व्हावं घनघोर, कोणाचा तरी जय आणि कोणाचा पराजय ठरवून संपूनही जावं, नंतर युद्धभूमीवर विखुरलेले असावेत केवळ धारातीर्थी पडलेल्यांचे अवशेष, तसा एकाकी पडलेला.. माणिकगडही तसा एकाकीच. एका कीर्द जंगलात आज दुर्लक्षित आणि उपेक्षेचं जीणं जगत असलेला विदर्भातला बेलाग-बुलंद आणि अनवट स्थापत्य शैलीनं नटलेला दुर्गराज!
   तोफांचा इतिहास बहुत प्राचीन, आरंभी छोटय़ा व नंतर अगदी मुलूखमैदान-मलिका-इ-मैदान नावाच्या विशालकाय तोफेपर्यंत. शत्रू जवळ येऊ नये, दूरच त्याला रोखता यावे, ठार करता यावे, एकाच वेळी अनेकांना ठार करता यावे, शत्रूचे अश्व आणि इतर सामग्री नष्ट करता यावी, यासाठी विकसित झालेले प्रभावी अस्त्र म्हणजे तोफ. सर्वच दुर्गावर दुर्गाच्या आवाक्यानुसार तोफांच्या जागा दिसतात. काही ठिकाणी अजूनही तोफा आढळतात. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावर भवानी मंदिरापुढे तोफांची आदिम रूपं पहायला मिळतात.
   एका बाजूनं बंद, परंतु वर बत्ती देण्यासाठी छोटंसं छिद्र, दुसऱ्या बाजूनं उसळणारा दारूगोळा. आकार-व्यास यानुसार माऱ्याचा पल्ला ठरलेला. तोफ तयार करण्याचं तंत्र आणि विचारही असा की, दारूगोळ्याच्या प्रहारानं आणि उसळण्यानं जो हादरा बसतो त्यानं तोफ भंगू नये, अशा धातूनं तिचं निर्माण होत असे. त्यातही धातू-मिश्रधातू असे अनेक प्रयोग, पण सारेच यशस्वी. अयशस्वी असं तंत्रच नाही. माणिकगडावरची ही तोफ पूर्ण नसली, तिच्या मूळ स्थानावरून ढळलेली असली तरी अनेक कारणांनी वैशिष्टय़पूर्ण ठरते. ही तोफ दुर्मिळ प्रकारात मोडते. अशाप्रकारच्या तोफा फार कमी आढळतात.
तोफांचे प्रामुख्याने प्रकार दोन, एक ओतीव तोफ आणि दुसरा घडीव तोफ. हा प्रकार ओतीव तोफेच्या आधीचा असाावा. माणिकगडावरची ही तोफ घडीव तोफ आहे. ओतीव तोफ म्हणजे धातू वितळवून साच्यात ओतून तयार केलेली तोफ. अशा तोफांचे आकार आणि निर्दोष परिणाम बघता हे साचे कसे तयार होत असेल याचे आश्चर्य वाटते. ओतीव या शब्दावरून असे वाटते की, हे साचे जमीन खोदून तोफेच्या आकारानुसार साचा तयार केला जात असावा. तोफ धातू ओतून ठरलेल्या तंत्रानुसार पूर्ण झाली की, मग ती बाहेर आल्यावर तिच्यावर इतर संस्कार केले जात असावेत. अर्थात, हे अगदी सुरुवातीचं, नंतरच्या तोफा बघता तोफ निर्मितीचं शास्त्र पुढे प्रचंड विकसित झालेलं दिसतं. अशी कथा ओतीव तोफेची.
   घडीव तोफ हा प्रकार ओतीव तोफेपेक्षा पुष्कळच वेगळा. घडीव म्हणजे घडवलेली, साच्याशिवाय निर्माण केलेली. या तोफेबद्दलही तीच दक्षता. एकदा नाही, तर हजारदा मारा केला तरीही प्रत्येक मारा तेवढाच परिणामकारक व्हावा, तोफेची क्षमता तर कमी होऊच नये, पण तोफही क्षतिग्रस्त होऊ नये. आजचं सहज सोपं असं कुठलंही तंत्रज्ञान किंवा यंत्रसामग्री नसताना कोणे एके काळी अशी परिणामकारक आयुधं तयार व्हावी हेच मोठं तंत्रज्ञान.
   घडीव तोफ ही ज्या धातूपासून तोफ तयार करणं नियोजित आहे, त्या धातूच्या तोफेच्या लांबीच्या सळया (रॉड) एका व्यवस्थित पद्धतीनं ठेवून त्यावर गोलाकार कडय़ांचं, तोफेच्या गोलाईच्या आकाराच्या कडय़ांचं-रिंगांचं संपूर्ण लांबीभर आच्छादन अशा पद्धतीनं घडवलेली दिसते. संपूर्ण घडण तुकडय़ांमधली असली तरीही संपूर्ण तोफ मात्र अगदी एकसंघ. कोणती कडी कधी तसूभरही हलेल किंवा जागा सोडेल हे अशक्यच, तशी तर शंकाही येऊच नये. म्हणूनच आज हजारो वर्षांचा ऊन्ह-वारा-पावसाचा मारा झेलूनही माणिकगडावरची ही तोफ जशीच्या तशीच आहे. फक्त मूळ स्थानावरून थोडी ढळली आहे. तोफ आपल्या स्थानावरून ढळली कशी, हे सुद्धा एक कोडंच आहे, कारण आज जो सुमारे दहा फूट तोफेचा हा तुकडा उरला आहे, त्याला दहा जणांनी लावले तरी तो हलणार नाही. एवढी ही तोफ वजनी आहे.
   विदर्भात तशाही तोफा कमीच आहेत आणि त्यात हा जो प्रकार माणिकगडावर आहे तो दुर्मिळ आहे म्हणून महत्त्वाचा ठरतो, पण हे महत्त्व कदाचित वर्तमानाला सहन झालं नसावं. म्हणूनच त्यानं या तोफेला आदिअंत ठेवला नाही. का कोण जाणे कसा, पण हा मधलाच तुकडा या गडावर पहुडला आहे. त्याचे दोन्ही बाजूंचे तुकडे तोडल्या-कापल्या गेलेत. एवढी मजबूत तोफ असूनही तिचे असे तुकडे कोणी व का केले असतील, कोणत्याही सद्हेतूनं हे कृत्य केलेलं नाही, हे तर स्पष्टच आहे.
   दु:ख सजीवांनाच होतं असं नाही. ज्यात जीव नाही अशा गोष्टी निर्जीव असतात, असंही नाही. त्यांनी प्रवास पाहिला अनुभवला असतो. या तोफेला साथसंगत होत तिच्या बाजूला पडलेल्या एका भग्न, पण देखण्या गणेशप्रतिमेची, पण आता कालपरवापासून तिही दिसत नाहीय कुठं. तोफ एकटीच पडली आहे. सभोवताल घनदाट वनराई. बुलंद-बेलाग-दुर्गम, पण आता परिस्थिती शरण माणिकगड. दुर्गम भाग. श्वापदांचा सहज संचार हा या तोफेचा आसमंत. या आसमंतात क्षतिग्रस्त होऊनही येणाऱ्या, अवचित पांथस्थाचं ही तोफ आनंदानं स्वागत करत आहे. स्वत:चं दु:ख विसरत आहे, पण कधीतरी कोणीतरी ते समजून घ्यावं, थोडी सहअनुभूती दाखवावी, अशी तिचीही अपेक्षा असेलच, पण जिथं तिच्यापर्यंतच कोणी पोहोचू शकत नाही तिथं तिच्या या भावनांपर्यंत कोण पोहोचेल?

Story img Loader