मान्सून चांगलाच बरसत असल्याने निसर्ग हिरवाईने नटला असून अशा मन प्रसन्न करणाऱ्या वातावरणात गिरिभ्रमणाचा आनंद देण्यासाठी येथील वैनतेय गिर्यारोहण गिरिभ्रमण संस्थेच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
याअंतर्गत रविवारी अंजनेरी व त्र्यंबकेश्वर परिसरातील डोंगरदऱ्यांमध्ये भटकंती करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त शांताराम रायते व मनोज बाग यांनी दिली.
सकाळी ६.३० वाजता शहरातील मेळा बस स्थानकातून अंजनेरीच्या दिशेने कूच करण्यात येईल. त्यानंतर पहिने, नवरा-नवरी, मुळेगाव घळीमार्गे चौफुली अशी साधारणत: सहा ते आठ तासांची भ्रमंती करण्यात येईल. त्यानंतर २८ जुलै रोजी त्र्यंबकेश्वर-शेरीचापाडा, उटवड, निरगुडपाडा, १८ ऑगस्ट रोजी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा, २२ ते २५ ऑगस्ट या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्य़ातील पन्हाळा, मसाई पठार, पावनखिंड, विशालगड यांच्यावर चढाई करण्यात येईल.१ सप्टेंबर रोजी कसारा, भैरोबा माळ, १४ व १५ सप्टेंबर रोजी इगतपुरी, शहापूर, मुरबाड, खांडस, भीमाशंकर, शिडी घाटमार्गे भीमाशंकर, १५ सप्टेंबर रोजी गणपती घाटमार्गे खांडस, मुरबाड, शहापूर, नाशिक याप्रमाणे भटकंती करण्यात येणार आहे.
पहिल्या तीन मोहिमांसाठी मेळा बस स्थानकातून सकाळी साडेसहा वाजता प्रस्थान होईल. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संस्थेचा सभासद असणे आवश्यक आहे.
 अधिक माहितीसाठी सायंकाळी सहा ते आठ या कालावधीत वैनतेय गिर्यारोहण गिरिभ्रमण, विश्रामबाग संकुल, दुसरा मजला, सरस्वती स्टेशनरीच्या वर, मेनरोड, नाशिक येथे संपर्क साधावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varsha bhatkanti from this sunday