वर्षां जलसंचयन प्रकल्प उत्तमरित्या राबविणाऱ्या मुंबईतील खासगी सोसायटय़ांना मालमत्ता करात सवलत द्यावी, तसेच महापालिकेच्या आस्थापना, उद्याने येथेही मोठय़ा प्रमाणात वर्षां जलसंचयन प्रकल्प राबवावेत, असे आवाहन महापौर सुनील प्रभु यांनी केले.
‘वर्षां जलसंचयन’ ही आता काळाची गरज आहे. त्यामुळे नवीन निवासी आणि व्यापारी संकुलांना निवासी प्रमाणपत्र देताना वर्षां जलसंचयन प्रकल्प प्रभावीपणे राबविले आहेत की नाहीत याची खातरजमा करावी, असेही महापौर म्हणाले.
महाराष्ट्रात दुष्काळ आहे. मुंबईत अशी परिस्थिती नसली तरी आगामी काळात मुंबईकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये यासाठी मुंबईत प्रत्येक विभागनिहाय ज्येष्ठ नागरिक संघाची मदत घेऊन पाणी संवर्धनाबाबत प्रबोधन कार्यशाळा आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेच्या जल विभाग व ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यावतीने महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात ‘पाणी संवर्धन’ या विषयावर कार्यशाळा आयोजिण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत         होते.
कार्यशाळेत स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे, शिक्षण समिती अध्यक्ष विठ्ठल खरटमोल, महापालिका आयुक्त सीताराम कुंटे आदी उपस्थित होते.