वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या १६ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०१३ या कालावधीत गाळपासाठी आलेल्या उसाचा पहिला हप्ता १८०० रुपये याप्रमाणे संबंधित उत्पादकांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. डी. एस. आहेर यांनी दिली. कारखान्याच्या २०१२-१३ गळीत हंगामातील या कालावधीत गाळपासाठी आलेल्या २७ हजार ५७९ मेट्रिक टनाचे बिल देणे बाकी होते. ऐन गळीत हंगामात डॉ. जे. डी. पवारांसह त्यांच्या समर्थकांनी राजीनामे दिल्याने आणि राज्य सहकारी बँकेसह इतर देणी वाढल्याने संबधित उस उत्पादकांसह कामगारांची देणी देण्यासंदर्भात प्रश्न निर्माण झाला होता.
कारखान्याची सूत्रे हाती घेताच उर्वरित संचालक मंडळाने राज्य सहकारी बँकेकडे ऊस उत्पादक व कामगारांसाठी १० कोटी ९५ लाख रुपयांची उचल मागितली. त्यात ऊस उत्पादकांचे चार कोटी ९६ लाख रुपये व कामगारांसाठी चार महिन्यांचे वेतन, मागील तीन वर्षांचा भत्ता असा पाच कोटी ९९ लाख रुपयांचा समावेश होता.
परंतु मागील संचालक मंडळाने अवास्तव उचल घेऊन राज्य सहकारी बँकेच्या कर्जाचे हप्ते थकविले होते. अशा परिस्थितीत मुंबई येथे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासमवेत कारखान्याच्या प्राप्त परिस्थितीबाबत बैठक होऊन राज्य सहकारी बँकेने फक्त ऊस उत्पादकांसाठी चार कोटी ९६ लाख रुपये उचल देण्याचे मान्य केले होते.
तर कामगारांबाबत कारखान्यानेच पैसे उपलब्ध करावेत, असे ठरले होते. त्यानुसार राज्य सहकारी बँकेने ऊस उत्पादकांसाठी चार कोटी ८८ लाख रुपये मंजूर केले असून त्यातील आठ लाख रुपयांचा कारखान्याच्या मालमत्तेचा विमा राज्य सहकारी बँकेने काढला आहे; तर उर्वरित चार कोटी ८० लाख रुपये संबंधित उस उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले असून उर्वरित १६ लाख रुपयेही आठ दिवसांत संबंधितांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. आहेर यांनी दिली.
कामगारांना थकीत वेतनासह इतर देणी देण्याबाबत व्यवस्थापनाच्या वतीने राज्य सहकारी बँकेकडे मागणी करण्यात आलेली आहे. त्यासंदर्भातही पाठपुरावा सुरू असून कामगारांनाही लवकरात लवकर पैसे उपलब्ध करून देण्यास आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही डॉ. आहेर यांनी दिली. या वेळी ज्येष्ठ संचालक संतोष मोरे, मधुकर पगार, रामदास देवरे, यशवंत गवळी आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा