समन्वय प्रतिष्ठानच्या वतीने २२ नोव्हेंबर रोजी आयोजित वसंत बाल महोत्सवासाठी सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांनी एक खास गाणे तयार केले असून शहरातील तब्बल ५० हजार विद्यार्थी एका सुरात ते गाणार आहेत. दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये शुक्रवार, २२ नोव्हेंबर रोजी ‘एक सूर एक ताल’ या कार्यक्रमाने या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. या महोत्सवात ठाणे शहरातील शंभरहून अधिक शाळांमधील एक लाख मुले-मुली सहभागी होणार आहेत.
सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांनी संगीतबद्ध केलेले राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे एक खास गाणे हे या महोत्सवाचे एक प्रमुख आकर्षण आहे. तसेच या महोत्सवासाठी मॉन्जिनीजतर्फे तब्बल दोन हजार चौरसफुटांचा आणि दोन हजार किलो वजनी केक बनविण्यात येईल. उपस्थित विद्यार्थी त्यावर आयसिंग करणार आहेत. महोत्सवात रंग उमंग ही चित्रकला स्पर्धा तर जॉय फिट ही नृत्यस्पर्धा होईल. त्याचप्रमाणे मुलांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी ‘बेस्ट आऊट ऑफ वेस्ट’ या संकल्पनेवर आधारित फॅशन शो होईल. ‘बाल संसद’ हे या महोत्सवाचे आणखी एक विशेष आकर्षण आहे. यात बारा शाळांचे विद्यार्थी नागरी समस्यांविषयीचे सादरीकरण शासकीय अधिकाऱ्यांसमोर करतील. बालसंसदेचा हा उपक्रम महोत्सवापुरता मर्यादित राहणार नसून तो पुढेही नियमितपणे राबविला जाणार आहे. ‘बाय बेस्ट बडी’ ही पाळीव प्राण्यांबरोबरचे मुलांचे नाते उलगडणारी स्पर्धाही होईल. शनिवारी, २३ नोव्हेंबर रोजी महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात मुलांचे आवडते छोटा भीम आणि त्याचे सहकारी राजू, चुटकी, कालू, ढोलू, बोलू हे सर्व सवंगडी मुलांच्या भेटीला येणार आहेत. पारितोषिक वितरणाने महोत्सवाची सांगता होईल. या महोत्सवास मुलांना नि:शुल्क प्रवेश आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Nov 2013 रोजी प्रकाशित
ठाण्यात वसंत बाल महोत्सव..!
समन्वय प्रतिष्ठानच्या वतीने २२ नोव्हेंबर रोजी आयोजित वसंत बाल महोत्सवासाठी सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांनी एक खास गाणे तयार केले असून शहरातील
First published on: 19-11-2013 at 06:49 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasant childrens festival in thane