विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मनसेमधून बाहेर पडलेले माजी आमदार वसंत गीते भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक दिवस कोणत्याही कार्यक्रमात सहभागी न झाल्याने गीते समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली असतानाच गीते हे भाजपमध्ये सक्रिय झाले आहेत. भाजपच्या सभासद नोंदणी अभियानाच्या निमित्ताने मुंबई नाक्यावरील सावित्रीबाई फुले चौकात आयोजित कार्यक्रमात गीते यांनी राष्ट्रीय पक्ष संघटन वाढीसाठी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन नाशिककरांना केले.
गीते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी स्थानिक पातळीवर त्यांच्या प्रवेशावरून विभिन्न मतप्रवाह निर्माण झाले आहेत. त्यामुळे भाजप प्रवेशानंतर महिन्यापेक्षा अधिक कालावधी होऊनही गीते हे भाजपच्या कोणत्याच कार्यक्रमात जाहीरपणे सामील होताना दिसत नव्हते. त्यांच्या या भूमिकेमुळे गीते समर्थक तसेच भाजपमध्येही अस्वस्थता निर्माण झाली होती. गीते हे आपल्या प्रवेशामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये कोणकोणत्या प्रतिक्रिया उमटल्या, त्याचा अंदाज घेत असल्याचेही सांगण्यात आले. परंतु अखेर कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर करीत भाजपच्या नोंदणी अभियानानिमित्त आयोजित कार्यक्रमास अलीकडेच गीते यांनी उपस्थिती लावली. सभासदांची नोंदणी करीत असताना पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत कसे पोहोचणार, याकडेही कार्यकर्त्यांनी अधिक लक्ष देण्याचे आवाहन गीते यांनी केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने या अभियानात सहभाग घेऊन प्रबोधन करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. या वेळी सुरेश पाटील, युवा मोर्चाचे अध्यक्ष गिरीश पालवे, प्रशांत जाधव, सचिन ठाकरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल वाघ यांनी केले. आभार जगदीश पाटील यांनी मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा