प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या नाशिक वसंत व्याख्यानमालेच्या ९२ व्या सत्रास बुधवारपासून सुरूवात होत आहे. सायंकाळी सात वाजता व्याख्यानमाला अर्थात या ज्ञानसत्राचे उद्घाटन महापौर अॅड. यतिन वाघ यांच्या हस्ते होणार आहे.
उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी विलास पाटील, उपमहापौर सतीश कुलकर्णी, पालिका आयुक्त संजय खंदारे, स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे आदी उपस्थित राहणार आहेत. १ ते ३१ मे या कालावधीत सुरू राहणाऱ्या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प सद्गुरू प्रल्हाद (दादा) पै ‘दिल्याने होत आहे रे’ या विषयावर गुंफणार आहेत. जीवन विद्या मिशन या संस्थेचे प्रमुख विश्वस्थ म्हणून ते काम पाहत आहे. संपूर्ण महिनाभर चालणाऱ्या व्याख्यानमालेत यंदा जलसंपदा खात्यातील गैरप्रकार मांडणारे विजय पांढरे, मॅगसेसे पुरस्कारप्राप्त नीलिमा मिश्रा, माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांसारख्या मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे. या शिवाय, यंदा व्याख्यानासाठी देशात महिला सुरक्षित आहेत काय, आगामी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरची परिस्थिती, शेतकरी व दुष्काळ, स्पर्धा परीक्षा व युवकांपुढील आव्हाने, एलबीटी महानगराला तारक की मारक, असे वेगवेगळे विषय निवडण्यात आले आहे. वसंत व्याख्यानमालेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी व कार्याध्यक्ष चंद्रशेखर शहा यांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा