वाशीतील एका व्यापाऱ्याच्या कंपनीचा ई-मेल हॅक करून त्या माध्यमातून कंपनीच्या ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याचे मेल पाठवून चोरटय़ांनी तब्बल पाच लाख रुपये रकमेचा अपहार केला आहे. ग्राहकांकडून या संबंधी माहिती मिळाल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी व्यापाऱ्याने एपीएमसी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून दोन जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभाकरण नायर असे या फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. नायर यांच्या कंपनीचा ई-मेल गोरेगाव येथील इब्राण मुक्तार शेख आणि रवीकुमार बशिद सिंग हॅक करून कंपनीचे ग्राहक असलेल्या स्वित्र्झलड येथील साई ट्रेडर्स कंपनीला मेल पाठवून कंपनीचे देणे गोरेगाव येथील एका बॅंक खात्यात जमा करण्यास सांगितले. सदर जमा झालेल्या रकमेपैकी ४ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम शेख आणि सिंग यांनी काढून घेतली. या प्रकरणी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एपीएमसी पोलिसांनी सांगितले.