इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या मानांकनानुसार वाशी येथे सिडकोच्या वतीने बांधण्यात येणारे देशातील पहिले संपूर्ण वातानुकुलीत प्रदर्शन केंद्र धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे आणखी सहा महिन्यांसाठी रखडले आहे. या प्रदर्शन केंद्राचे ९५ टक्के काम झाले असून शेवटचा हात फिरवताना पावसाने खो घातला. त्यामुळे अगोदरच तीन महिने उशिर झालेले हे प्रदर्शन केंद्र आता आणखी पाच महिने पूर्ण होणार नाही असे दिसून येते.
मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई यासारख्या महानगरात मोठी प्रदर्शन केंद्र आहेत. त्यामुळे सिडकोनेही वाशी सेक्टर ३० अ मध्ये साडेसात हेक्टर जमिनीवर देशातील पहिले संपूर्ण वातानुकुलीत प्रदर्शन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मागील चार वर्षे या प्रदर्शन केंद्राचे काम सुरु होत आहे. २४० कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात येणाऱ्या या प्रदर्शन केंद्रात केवळ प्रदर्शन केंद्र नसून समांतर मार्गावर बिझनेस सेंटर देखील उभारण्यात येत आहे. त्यामुळे सोन्यापासून मोटारीपर्यंत असणाऱ्या सर्व श्रीमंत वस्तूंचे प्रदर्शन या केंद्रावर भरणार आहे. हे प्रदर्शन व बिझनेस सेंटर पूर्णपणे वातानुकुलीत आहे. इतर ठिकाणी असणाऱ्या प्रदर्शन सेंटर मध्ये आयोजकांना तात्पुरत्या वातानुकूलची व्यवस्था करावी लागते. आयजीबीसीच्या मानंकनानुसार ही ग्रीन बिल्डिंग असल्याने या केंद्रामध्ये थेट सूर्यप्रकाश मिळणार आहे.  तळमजल्यावर २१ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा प्रदर्शन केंद्र देशातील सर्वात मोठे केंद्र राहणार आहे. याशिवाय फूड कोर्ट, सभागृह, बिझनेस सेंटर मध्ये दोन सभागृह, प्रशासकीय जागा,लायब्ररी याची व्यवस्था करण्यात आली आहे. जून २००९ रोजी या प्रदर्शन केंद्राचे काम सुरु झाले आहे. सायन पनवेल महामार्गावर हे केंद्र आहे. सायन पनवेल महामार्गाचेही दहा पदरी रुंदीकरण होत आहे. त्यामुळे या केंद्राला भविष्यात मोठी मागणी लक्षात घेऊन सिडकोने त्याची आखणी केली आहे पण सध्या हे काम रखडले आहे. चार वर्षांत हे काम पूर्ण केले जाणार होते पण सिडकोला ते पूर्ण करता आलेले नाही. त्यामुळे जून १३ मध्ये पूर्ण होणारे काम आता डिसेंबर १३ मध्ये पूर्ण होणार असल्याचे अधीक्षक अभियंता आर. बी. धायटकर यांनी सांगितले. जून नंतर एक दोन महिन्यात हे काम करताही आले असते पण संततधार पडणाऱ्या पावसामुळे टच अपची कामेही करता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा