* रुग्णालयाच्या आवारात चित्रीकरण
* महापालिकेने बजावली नोटीस
* स्थायी समिती सभेत गदारोळ
* करार रद्द करण्याची नगरसेवकांची मागणी
नवी मुंबई महापालिकेला अंधारात ठेवून रुग्णालयाच्या आवारात ‘क्रिश-३’ चित्रपटाच्या चित्रीकरणास मंजुरी देणारे वाशीतील फोर्टीस-हिरानंदानी रुग्णालयातील व्यवस्थापन पुन्हा एकदा वादात सापडले आहे. महापालिकेच्या सुमारे दहा हजार चौरस फुटाच्या जागेत फोर्टीसने आपले आलिशान असे सुपरस्पेशालिटी रुग्णालय थाटले आहे. जागेची मालकी महापालिकेची असल्याने याठिकाणी कोणताही कार्यक्रम करताना आरोग्य विभागाची परवानगी घ्यावी, असा करार यापुर्वीच झाला आहे. असे असताना क्रिश-३ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी रुग्णालय परिसर भाडेतत्वावर देताना फोर्टीस व्यवस्थापनाने महापालिकेची परवानगी घेतली नसल्याचा प्रकार उघड झाला आहे. यामुळे संतापलेल्या महापालिकेने फोर्टीस व्यवस्थापनास कारणे दाखवा नोटीस पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबईत एखादे सुपरस्पेशालिटी रुग्णालय असावे आणि तेही महापालिकेच्या अधिपत्याखाली सुरु व्हावे, यासाठी काही वर्षांपुर्वी महापालिकेने आपल्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयातील दोन मजले हिरानंदानी-फोर्टीस समूहास भाडेपट्टयावर देउ केले. या रुग्णालयात महापालिका संदर्भीत करेल, अशा रुग्णांसाठी दहा टक्के खाटा राखीव ठेवल्या जाव्यात, असा करारही करण्यात आला. या जागा अजूनही पुरेशा प्रमाणात भरल्या जात नाहीत, अशी बहुतांश लोकप्रतिनिधींची तक्रार असून यामुळे महापालिका आणि फोर्टीस व्यवस्थापनात वरचेवर खटके उडत असतात. या पाश्र्वभूमीवर क्रिश-३ चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे नवा वाद निर्माण झाला असून फोर्टीस रुग्णालयातील व्यवस्थापन नव्या वादात सापडले आहे. मुळात रुग्णालयाच्या आवारात किंवा त्या परिसरात अशाप्रकारे कोणत्याही चित्रपटाच्या चित्रीकरणास परवानगी नाही. हा सर्व परिसर महापालिकेने यापुर्वीच सायलेन्स झोन म्हणून जाहीर केला आहे. महापालिका आणि फोर्टीस-हिरानंदानी व्यवस्थापनात झालेल्या करारातही अशाप्रकारे चित्रीकरणास परवानगी देण्यासंबंधी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. असे असताना नवी मुंबई महापालिकेस अंधारात ठेवून या रुग्णालयाच्या आवारात बडय़ा चित्रपटांचे चित्रीकरण होत असल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. काही वर्षांपुर्वी थ्री-इडीयट्स् या प्रसिद्ध चित्रपटाचे चित्रीकरण याच रुग्णालयात झाले होते. तेव्हाही रुग्णालय व्यवस्थापनाने महापालिकेस कोणत्याही सूचना दिल्या नव्हत्या. दोन दिवसांपुर्वी क्रीश-३ या राकेश रोशन दिग्दर्शित चित्रपटासाठी रुग्णालयातील तळमजला तसेच आसपासचा परिसर भाडय़ाने देण्याचा निर्णय फोर्टीस व्यवस्थापनाने घेतला. चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे या भागात बघ्याची मोठी गर्दी जमली तसेच वाहनांची मोठी कोंडी झाली. वाहतूक कोंडीमुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना मोठय़ा त्रासास सामोरे जावे लागत होते. रुग्णवाहिकाही रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापर्यत पोहचू शकत नव्हती.
वाशीतील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नगरसेवक वैभव गायकवाड यांनी हे दृश्य पाहीले असता त्यांनी रुग्णालयांच्या व्यवस्थापनास यासंबंधी जाब विचारला. मात्र, त्यांनाही उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. दरम्यान, स्थायी समिती सभेत यासंबंधी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत गायकवाड यांनी फोर्टीस व्यवस्थापनाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. रुग्णांना सेवा मिळावी यासाठी महापालिकेने आपली जागा भाडेपट्टयावर दिली आहे. असे असताना याठिकाणी चित्रीकरणास परवानगी देऊन फोर्टीस मोठा नफा कमवित असून यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे, असा मुद्दाही गायकवाड यांनी मांडला. दरम्यान, अशास्वरुपाच्या चित्रीकरणाची कोणतीही परवानगी महापालिकेकडून घेण्यात आली नव्हती. त्यामुळे यासंबंधी कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त नामदेव अल्हाट यांनी स्थायी समिती सभेत दिली. करारातही अशास्वरुपाच्या चित्रीकरणाच्या परवानगीचा उल्लेख नाही. त्यामुळे यासंबंधीच्या कायदेशीर बाबी तपासल्या जातील, असेही अल्हाट यांनी स्पष्ट केले. 

Story img Loader