नवी मुंबईतील गरीब, सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना सेवा पुरविण्यासाठी उभारण्यात आलेले वाशी येथील महापालिकेचे ३०० खाटांचे प्रथम संदर्भ रुग्णालय सध्या तळोजा कारागृहातील आजारी कैद्यांसाठी नंदनवन बनू लागले आहे. कायद्याने आवश्यक असा कोणताही ‘कैदी विभाग’ (प्रिझनर्स वॉर्ड) अस्तित्वात नसतानाही या रुग्णालयात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी, डी. के. राव, सुनील घाटे असे बडे गँगस्टर तर शिशिर धारकर, ओम कलानी असे अतिमहत्त्वाचे कैदी आजारांवर उपचार करण्यासाठी वरचेवर हजेरी लावत असतात. त्यामुळे या ‘हाय प्रोफाइल’ रुग्णांची सरबराई करताना रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची अक्षरश: भंबेरी उडू लागली आहे.
विशेष म्हणजे, या ठिकाणी अशा कैद्यांना दाखल करून घेऊ नये, असे स्पष्ट आदेश तत्कालीन आयुक्त विजय नहाटा यांच्या काळात काढण्यात आले आहेत. असे असतानाही या बडय़ा कैद्यांना उपचारासाठी दाखल करून घेणारे नवे रॅकेट सुरू झाल्याची चर्चा रंगली असून रुग्णालय व्यवस्थापनातील काही बडे अधिकारी, नगरसेवक यामध्ये सहभागी असल्याचे बोलले जाते.
तळोजा कारागृह हे राज्यातील मोठय़ा कारागृहापैकी एक आहे. अतिशय गंभीर गुन्ह्य़ांमधील बडे आरोपी या कारागृहात बंद आहेत. येथील कैद्यांना वैद्यकीय तपासणी तसेच उपचारांसाठी नवी मुंबई महापालिकेचे वाशी येथील रुग्णालय जवळचे आणि सोयीचे पडते. त्यामुळे या कारागृहातील कैद्यांचा येथे नेहमीच वावर दिसून येतो. मुळात वाशी रुग्णालयात कैद्यांना दाखल करून घेण्यासाठी आवश्यक असा कैदी विभाग अस्तित्वात नाही. शासनाच्या निकषांनुसार  कैदी विभागात पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवणे बंधनकारक असते. तसेच या विभागात सीसी टीव्ही कॅमेरे बसविले जावेत, असाही दंडक आहे. वाशी रुग्णालयात कायद्याने प्रमाणित असा कैदी विभाग नाही. त्यामुळे या सुविधाही येथे नाहीत. असे असतानाही बडय़ा, हाय प्रोफाइल कैद्यांना दाखल करून घेण्याचे सोयीचे ठिकाण म्हणून सध्या वाशी रुग्णालयाचा वापर होतो आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
वाशी रुग्णालयात कैद्यांना केवळ तपासणीपुरते आणले जावे, असे आदेश आहेत. तपासणीनंतर दाखल करून घेण्याची आवश्यकता भासल्यास अशा रुग्णांची रवानगी ठाण्यातील सिव्हिल तसेच मुंबईतील जे. जे. रुग्णालयात केली जावी, असे नहाटा यांच्या आदेशात म्हटले आहे. मात्र, आयुक्तांच्या या आदेशाला रुग्णालयातील व्यवस्थापन केराची टोपली दाखवत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
साधारण वर्षभरापूर्वी कोटय़वधी रुपयांची बॅंक बुडविणे, तसेच १२०० कोटींचा हवाला देणे, असे गंभीर आरोप असणारा पेण-अर्बन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी शिशीर धारकर याला रुग्णालयातील वातानुकूलित अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आल्याने मोठा गहजब उडाला होता. अतिदक्षता कक्षात दाखल करण्यासारखा कोणता आजार धारकर याला झाला आहे, अशी विचारणा तत्कालीन आरोग्य सभापती शिवराम पाटील यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला केली होती. त्यावर धारकर कसा आजारी आहे, याचा पाढा रुग्णालय व्यवस्थापनाने त्यांच्यापुढे वाचला. शरीरातील ‘क्रिएटिन’ वाढले म्हणून धारकर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल होता. एरवी रुग्णाची प्रकृती बिघडल्यास त्यास वाशी रुग्णालयातून मुंबईतील जे. जे. तसेच के. ई. एम. रुग्णालयात पाठविले जाते. मात्र, धारकर याची पाठवणी जे. जे. येथून नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात करण्यात आली होती. ही ‘पदावनती’ नेमकी कशी झाली, याची खमंग चर्चा तेव्हा वैद्यकीय वर्तुळात सुरू होती. काही महिन्यांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन डी. के. राव याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. राव रुग्णालयात दाखल असताना त्याच्या वाढदिवसाची जोरदार पार्टी रुग्णालयातच आयोजित करण्यात आली होती. डॉक्टर, कर्मचाऱ्यांनीही राव याची मेजवानी झोडल्याची तेव्हा चर्चा होती. तळोजा कारागृहात दाखल असलेला अरुण गवळी याला अधूनमधून रुग्णालयात तपासणीसाठी आणले जाते. या वेळी गवळीचा थाट काही औरच असतो, असे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. पप्पू कलानीचा मुलगा ओम कलानी यालाही या ठिकाणी काही दिवस उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.     
यासंबंधी नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी कैदी विभाग अस्तित्वात नाही, असे सांगितले. असा विभाग नसल्याने रुग्णांना केवळ तपासणी करून सिव्हिल तसेच जे.जे. रुग्णालयात पाठवायला हवे. मात्र, मानवतावादी दृष्टिकोन ठेवून आजर गंभीर असल्याने आम्हाला रुग्णांना दाखल करून घ्यावे लागते, असे सिन्नरकर यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा