सकाळच्या रामप्रहरी गावाखेडय़ांत घरोघरी फिरणारे वासुदेव सिडको वसाहती आणि पनवेलमधील रहिवाशांना सामाजिक विषयांच्या गजराने उठवत आहेत. उन्हाळी तडाका या वासुदेवांना बसला आहे. त्यामुळे शहरातील उशिरा होणारी पहाट आणि दुपारच्या उकाडय़ाच्या लवकरच घरी परतण्याची वेळ या वासुदेवांवर आली आहे.
सामाजिक विषयांचा जनजागृतीसाठी हातात टाळ, चिपळ्यांची साथ घेत या वासुदेवांचे आगमन शहरातील सोसायटय़ांमध्ये होत आहे. ओमकार वासुदेव हे पनवेलसह उपनगरांमध्ये फिरत आहेत. ओमकार वासुदेवांच्या डोक्यावर मोरपिसांची टोपी, त्यावर देवदेवतांच्या अधिरूपांची चित्रे, गळ्यात रुद्राक्ष, मोती आणि तुळशीच्या माळा तसेच अंगात पांढऱ्या पोशाखात धोतर, अंगात कुडता त्यावर शेला आणि उठा उठाच्या मधुर स्वरांनी सिडको वसाहती दुमदुमल्या आहेत. शहरातील धकाधकीच्या जीवनशैलीत वासुदेवांनी पहाटे उठवण्याच्या वेळाही बदलल्या आहेत. सध्या हे वासुदेव सात वाजल्यानंतर रहिवाशांना जाग आणत आहेत. उगाचची साहेबांची झोपमोड झाल्यास पदरात पडणारे दान गमावण्याची भीती वासुदेव ओमकार यांनी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केली. उन्हाळ्याच्या उकाडय़ामुळे वासुदेवांची ही रामप्रहरी दुपारी अकरा वाजेपर्यंत सुरू असते. शहरात राहणाऱ्या रहिवाशांना हे वासुदेव माणुसकीची हाक टाकत फ्लॅटमध्ये राहिले तरीही एकमेकांच्या साहाय्यासाठी जवळ या, संवाद वाढवा, संवेदनशील नागरिक बना असा संदेश देत आहेत. ओमकार वासुदेव हे मूळ पुणे जिल्ह्य़ातील बारामती तालुक्यातील माळेगावचे. त्यांचे नाव भाऊराव गोंडे असे आहे. गोंडे वासुदेवाच्या भूमिकेतून नवी मुंबईमध्ये घरी परतताना शंभर ते दीडशे रुपये रोख आणि मिळणारे कापडदान,धान्य घेऊन आपला उदरनिर्वाह करत असल्याचे सांगतात.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा