सत्यानुसार समाज चालायला पाहिजे. समाजानुसार सत्य नव्हे, वेदांत आणि एकात्मतेवर आधारलेली जीवनपद्धतीच या जगाला वाचवेल. आपण आपला धर्म सोडल्यामुळे समाजात अनतिकता, स्वार्थ व अधार्मिकता वाढली आहे, असे कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्ष निवेदिताताई भिडे म्हणाल्या.
येथील प्रमिलाताई ओक सभागृहात स्वामी विवेकानंद सार्धशती समारोह समितीने आयोजिलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. भारत जागो-विश्व जगाओ हा त्यांचा भाषणाचा विषय होता.
भारत जागो-विश्व जगाओ हा केवळ नारा वा घोष नव्हे, तर स्वामी विवेकानंदाच्या समग्र संदेशाचे ते सार आहे. युरोपीय व पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीचा अभ्यास केलेले विवेकानंद हे एकमेव व्यक्ती होत. अनुभूतीवर आधारलेली विद्वत्ता आवश्यक आहे. ती स्वामीजींजवळ होती म्हणनूच अमेरिकेत अत्यंत उपहास, अपमान सहन करूनही स्वामीजींनी त्या सर्वाना प्रभावित करून निरुत्तर केले. अमेरिकेतील सर्व शास्त्रांचे व विषयांचे प्राध्यापक एकत्र आणून त्यांचे जेवढे ज्ञान असेल त्यापेक्षा कितीतरी पट अधिक विवेकानंदांची विद्वत्ता आहे, असे सर्वधर्म परिषद आयोजित करणाऱ्या प्राध्यापकाने तेथील सर्वाना ठणकावून सांगितले होते, असे त्या म्हणाल्या.
वेदांत आणि एकात्म मानवजीवन हाच समाजाचा खरा आधार आहे. आपल्या गुणदोषांचे अध्ययन करून आपण गुणवर्धन करावे व दोष सोडावे, असे स्वामीजींच्या कार्याचा दाखला देतांना त्या म्हणाल्या, चीन हा एक राक्षस असून हा जेव्हा जागा होईल तेव्हा सर्व जगाला त्रासदायक ठरेल, असे भविष्य स्वामीजींनी १०० वर्षांपूर्वीच वर्तविले होते. जगात पश्चिमी देशांचे अंधानुकरण केले जाईल, असे विवेकानंद म्हणाले होते. तसेच आज भारतात घडत आहे. भारत हा ईश्वर मानणारा देश आहे.
पण, अनेक लोक केवळ स्वार्थापायी त्याचे अस्तित्व नाकारतात. माझे कुटुंब म्हणजे मी, एवढीच समाजातील घटकांची भावना झाली आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, मनाला विभाजनाची सवय लावली तर ते साऱ्यांना तोडते. नाते बंध तोडते. या स्वार्थी वृत्तीमुळे मनुष्य जीवनातून नतिकता निघून जाईल.
मनुष्याला भीती दाखवून नतिक ठेवता येत नाही. वेदांतच नतिकतेचे उत्तर देऊ शकते. कुटुंब, समाज, राष्ट्र, निसर्ग, सृष्टी व परमेष्ठी, असे उत्तरोत्तर प्रगटीकरण मनुष्यातून व्हावे. समाज हे आपले विस्तृत स्वरूप जाणून त्याची सेवा करावी, असे स्वामीजींचे जीवन तत्वज्ञान सांगतले. आपल्यात आत्मविश्वास नाही. आपणच घरात संस्कार करीत नाही म्हणून नतिकता ढासाळली आहे. धर्माच्या आधारावर मिळवलेला पसा असावा. स्त्रियांनी अधिकार मागण्यापेक्षा धर्मावर जोर द्यायला हवा. अधिकाराच्या मागण्यातून कुटुंब समाज व राष्ट्र खंडित होते.
कन्याकुमारीचे विश्वास पाळकर यांनीही सार्धशतीनिमित्त विचार मांडले. प्रास्ताविक सत्यनारायण जोशी यांनी केले. संचालन महेश मोडक, तर आभार निशिकांत देशपांडे यांनी मानले. संजय तिकांडे यांनी खडय़ा व स्पष्ट आवाजात वंदेमातरम् गायिले.

Story img Loader