भाज्यांचे भाव साठ ते ऐंशी रुपये किलो या पातळीवर पोहोचल्यामुळे पुणेकरांना थोडा दिलासा देण्याचे काम बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले. फ्लॉवर, वांगी दहा रुपये, कोबी, टोमॅटो पंधरा रुपये आणि पालेभाज्या पाच रुपये गड्डी या दराने विकण्याचा उपक्रम मनसेने शहरात पाच ठिकाणी केला आणि अवघ्या तीन तासात दोन ट्रक भाज्या संपल्या.
आडत सहा टक्के करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात आडत्यांनी पुकारलेल्या बंदमुळे गुलटेकडी मार्केट यार्ड व शहरात भाज्यांची आवक मोठय़ा प्रमाणावर घटली आहे. परिणामी, भाज्यांचे दर कडाडले आहेत. आवक होत नसल्यामुळे अनेक भाज्यांचे दर प्रतिकिलो पन्नास ते ऐंशी रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जो भरुदड पडत आहे त्यातून थोडा दिलासा देण्याच्या दृष्टीने मनसेतर्फे बुधवारी शहरात पाच ठिकाणी स्वस्त दरातील भाजी विक्री केंद्र चालवण्यात आली.
या केंद्रांसाठी थेट शेतकऱ्यांकडून ताजा भाजीपाला खरेदी करण्यात आला आणि तो केंद्रांवर पोहोचविण्यात आला. सकाळी अकराच्या सुमारास केंद्रांवर भाजीची विक्री सुरू झाली आणि अवघ्या दोन-तीन तासात सगळी भाजी संपली, अशी माहिती  मनसेचे शहराध्यक्ष बाळा शेडगे यांनी दिली. नगरसेविका अस्मिता शिंदे, सुशीला नेटके, अनिता डाखवे, तसेच प्रशांत मते, संदीप शिंदे यांनी हा उपक्रम पाच केंद्रांवर पार पाडला. या केंद्रांवर कोबी व टोमॅटो पंधरा रुपये, फ्लॉवर व वांगी दहा रुपये, दुधी भोपळा वीस रुपये, ढोबळी व हिरवी मिरची चाळीस रुपये किलो तसेच मेथी, कोथिंबीर व पालक पाच रुपये गड्डी या दराने या भाज्या विकण्यात आल्या.
फडके हौद चौक, नरपतगीर चौक, गवरी आळी, सहकारनगर (गजाननमहाराज मंदिर चौक) आणि बिबवेवाडी या पाच ठिकाणी ही भाजी विक्री केंद्र चालवण्यात आली. यातील गवरी आळीतील केंद्र वगळता अन्य चार केंद्र गुरुवारी देखील सुरू ठेवण्यात येणार आहेत.