– राष्ट्रीय कृषी विकास योजना
– विदर्भातील आठ जिल्ह्य़ांचा समावेश
– दुकान व वाहनासाठी अनुदान
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शहरी भागासाठी भाजीपाला पुरवठा योजना तयार करण्यात आली असून राज्यातील नागपूर व पिंपरी चिचवड शहरांमध्ये हा प्रकल्प राबविला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा व ग्राहकांना उत्तम गुणवत्तेचा माल किफायतशीर भावात मिळावा हा या योजनेचा मुख्य हेतू आहे, अशी माहिती राष्ट्रीय फलोत्पादन अभियानचे मुख्य व्यवस्थापक एम. एस. देवनीकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये भाजीपाला पुरवठा करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम तयार करण्यात आला आहे. गेल्या वर्षी मुंबई शहरात हा उपक्रम राबविण्यात आला. यावर्षी नागपूर व पिंपरी चिंचवड या शहरांची निवड करण्यात आली आहे. दोन वर्षांचा हा कार्यक्रम आहे. उत्पादन आणि उत्पादकता वाढविणे, ग्राहकांना किफायतशीर भावात उत्तम दर्जाचा माल देणे, कुशल तसेच अकुशल लोकांना रोजगार मिळवून देणे आणि सुदृढ आरोग्य अशी या उपक्रमाची उद्दिष्टय़े आहेत.
विदर्भात नागपूर विभागातील सहा व अमरावती विभागातील दोन जिल्हे असे एकूण आठ जिल्ह्य़ांमध्ये हा उपक्रम राबविला जाईल. यासाठी शेतक ऱ्यांचे छोटे छोटे गट तयार करून एक हजार शेतक ऱ्यांची नोंदणीकृत संस्था तयार केली जाईल. हे करण्यासाठी दोन संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना एकत्र करणे, त्यांना माहिती देणे, कृषी अधीक्षकांशी संपर्क साधणे अशी कामे या संस्था पाहतील. उत्पादित भाजीपाल्याची विक्री शेतकरीच करणार असल्याने शेष लागणार नाही. शेतक ऱ्यांना दुकानांसाठी चार लाखांचे अनुदान दिले जाणार आहे. स्टॉल्ससाठी १५ हजारांचे आणि फिरते वाहन खरेदीसाठी दोन लाखाचे अनुदान देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी दोन शहरांसाठी १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Story img Loader