गेल्या आठवडय़ापासून मुंबईच्या दिशेने आटलेला भाजीपाल्याचा पुरवठा सोमवारपासून पूर्ववत झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीसंबंधी उठणाऱ्या उलटसुलट अफवांमुळे पुणे तसेच नाशिक जिल्ह्य़ातून वाशीतील घाऊक बाजारपेठेत पुरेशा प्रमाणात भाजीपाल्याचा पुरवठा होत नव्हता. सोमवारीही भाजीपाला बाजार सुरू राहील का, याविषयी व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये उशिरापर्यंत संभ्रमाचे वातावरण होते. मात्र सोमवारी बाजारपेठा सुरू रहातील, अशी घोषणा शिवसेना नेत्यांनी केल्याने सकाळपासून वाशीतील घाऊक बाजारपेठेत भाजीपाल्याने भरलेल्या वाहनांची अक्षरश: रांग लागल्याचे चित्र दिसून आले. मुंबई, ठाण्याच्या दिशेने दुपापर्यंत भाजीपाल्याने भरलेले सुमारे ४५० ट्रक रवाना झाले होते. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून मुंबईत रडतखडत सुरू असलेला भाज्यांचा पुरवठा पूर्ववत झाल्याचे चित्र होते.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या वाशीतील घाऊक बाजारपेठेत येणारा भाजीपाला पुढे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या किरकोळ बाजारांमध्ये रवाना होत असतो. गेल्या काही महिन्यांपासून राज्य सरकारने थेट पणन व्यवस्थेला मंजुरी दिली असली तरी घाऊक बाजारांमधून होणाऱ्या पुरवठय़ावर मुंबईतील जीवनावश्यक वस्तूंचे गणित अवलंबून असते. गेल्या आठवडाभरापासून मात्र मागणी आणि पुरवठय़ाचे हे गणित काही बिघडले होते. पुणे तसेच नाशिक जिल्ह्य़ातून मोठय़ा प्रमाणावर भाजीपाला मुंबईच्या बाजारात येत असतो. दिवाळीच्या सणात भाजीपाला बाजारातील व्यवहार काहीसे मंदावतात. त्यामुळे इतर दिवसांच्या तुलनेत या काळात मुंबईकरांना होणारा भाजीपाल्याचा पुरवठा तसा कमीच असतो. गेल्या बुधवारपासून शिवसेनाप्रमुखांच्या प्रकृतीविषयी उलटसुलट चर्चाना अक्षरश: ऊत आल्याने दिवाळीनंतरही वाशीतील घाऊक बाजारात होणारा भाजीपाल्याचा पुरवठा काहीसा कमी झाला.
शेतकरी तसेच पुरवठादारांनी अफवांवर विश्वास ठेवून कमी प्रमाणात भाजीपाला पाठविल्याने मुंबईतील किरकोळ विक्रेत्यांनी दोन दिवसांत भाज्यांचे भाव कमालीचे वाढविले होते. शुक्रवारी बाळासाहेबांची प्रकृती स्थिर असल्याच्या बातम्या आल्याने शनिवारी तुलनेने अधिक प्रमाणात भाज्यांची आवक झाली होती. तरीही ही आवक पुरेशी नसल्याने मुंबईत भाज्यांचा काहीसा तुटवडा निर्माण झाला होता. या पाश्र्वभूमीवर सोमवारी घाऊक बाजारपेठा सुरू राहतील किंवा नाही याविषयी व्यापारी तसेच शेतकऱ्यांमध्ये काहीसे संभ्रमाचे वातावरण होते. सायंकाळी उशिरापर्यंत भाजीपाला बाजार सुरू राहतील का, याविषयी कुणालाही खात्री देता येत नव्हती. अखेर सोमवारी बंद करणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने जाहीर केल्याने रात्री उशिरा भाजीपाल्याने भरलेली वाहने वाशीच्या दिशेने रवाना झाली.
सोमवारी सकाळपर्यंत सुमारे ४३० गाडय़ा घाऊक बाजारात दाखल झाल्या, अशी माहिती भाजीपाला बाजाराचे उपसचिव अविनाश पाटील यांनी दिली. एरवीच्या तुलनेत आवक कमी असली तरी मुंबईच्या दिशेने भाजीपाल्याने भरलेल्या ४५० गाडय़ा रवाना झाल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून घाऊक बाजारात भाज्यांचा पुरवठा कमी असला तरी दरांमध्ये वाढ झालेली नाही. किरकोळ विक्रेत्यांनी केलेली भाजी दरवाढ ही कृत्रिम आहे, असा दावाही पाटील यांनी केला.

Story img Loader