‘अच्छे दिन आये है’, आता महागाई कमी होईल अशी अपेक्षा असताना नागरिकांना भाववाढीचा फटका बसायला लागला असून किरकोळ बाजारातील भाज्यांचे भाव गेल्या महिन्याच्या तुलनेत दुप्पट झाले आहेत. वांगे वगळता बहुतेक सर्व भाज्या महाग झाल्यामुळे घरातील बजेट कोसळले आहे. येणाऱ्या श्रावण महिन्यात सणांचा हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात भाज्यांचे भाव आणखी वाढण्याची चिन्हे असल्याची शक्यता भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केली.
केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर भाव स्थिर राहतील किंवा कमी होतील अशी अपेक्षा होती. मात्र, गेल्या काही दिवसात कांद्यासह कोबी, भेंडी, काकडी, पालक, तोंडले, कोहळे, टमाटे, चळवळीच्या शेंगा आदी भाज्यांचे भाव वाढले आहेत. काँग्रेस सरकार असताना डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीने त्रस्त झालेल्या नागरिकांना आता दैनंदिन लागणाऱ्या व जीवनावश्यक असणाऱ्या फळे व पालेभाज्यांचे दर कमी व्हावे, अशी अपेक्षा असताना महिनाभरातच पुन्हा पेट्रोल दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. नाशिकमध्ये कांदा व्यापाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे गेल्या महिन्यात १६ रुपये किलो प्रमाणे कांदा २५ रुपयांवर गेला आहे. तूर्तास कांदा व्यापाऱ्यांचा संप संपला असला तरी भाव मात्र कमी झालेले नाहीत. बटाटा २५ रुपये तर अन्य बहुतेक भाज्या ४० रुपयांवर आहेत.
जूनच्या पहिल्या आठवडय़ात पावसाची अपेक्षा असताना यावेळी तापमानाने कहर केला. मान्सून वेळेवर न आल्याने शेतकरी व ग्राहक त्रस्त झाले होते. सध्या विदर्भात पावसाने तोंड लपविल्याने फळ व पालेभाज्यांची आवक घटली आहे. परिणामी पावसाळा सुरू असूनही भडकलेल्या भाज्यामुळे सर्वसामान्यांना भाजी खरेदी करताना हात आखडता घ्यावा लागत आहे. नागपुरात येणारा भाजीपाला नागपूर जिल्ह्य़ातील आसपासच्या गावांतून येतो. आंध्रप्रदेश, नाशिक आणि विदर्भातील अन्य जिल्ह्य़ांतून मोठय़ा प्रमाणात येत असतो. उन्हाळ्यामध्ये आंब्याचे भाव गगनाला पोहोचले होते. मात्र, गेल्या आठवडय़ात आंब्याचे कमी झाले असली तरी बहुतेक भाज्या ४० रुपये किलोच्यावर आहे. या महागाईमुळे गरिबांना चिंता लागली आहे. किरकोळ बाजारात हिरवी मिरची ३० ते ३५ रुपये किलो, कोथिंबीर ५० ते ६० रुपये किलो, टोमॅटो ३० ते ४० रुपये किलो, पालक ३० ते ४० रुपये, भेंडी ३० ते ४०, चवळी २० ते २५, शिमला मिरची ३० ते ४०, कारले ३० ते ४०, काकडी २५ ते ३०, ढेमस ३० ते ४०, गाजर ३० ते ४०, तोंडले २५ ते ३०, कोहळे १५ ते २०, मेथी ४० ते ५०, आले ५० ते ६०, लसूण ७० ते ८०, मुळा १८ ते २० प्रतिकिलो विक्रीला आहे.
कांदा सध्या २५ रुपये किलोप्रमाणे विक्रीला आहे. व्यापाऱ्यांच्या संप पुन्हा सुरू झाला तर आणि आवक कमी झाली तर कांद्याचे भाव लोकांना रडायला लावतील, अशी चिन्हे आहेत. या दरवाढीचा फटका ग्राहकांबरोबरच लहान हॉटेलचालक, भेळविक्रेते व भोजनालयांनाही बसत आहे. दैनंदिन व जीवनावश्यक गोष्टीचे दर विविध कारणाने गगनाला भिडत आहेत. सध्या पाऊस नसल्याने भाज्यांचे दर वाढले आहेत. ही नेहमीची दरवाढ पाठ सोडायला तयार नाही, पुढे पाऊस वाढला तर भाज्यांचे नुकसान होईल म्हणून भाज्याचे दर चढेच राहतील, अशी प्रतिक्रिया बुधवार बाजारातील भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केली.
किरकोळ बाजारात भाज्या महागल्या
‘अच्छे दिन आये है’, आता महागाई कमी होईल अशी अपेक्षा असताना नागरिकांना भाववाढीचा फटका बसायला लागला
First published on: 21-06-2014 at 07:01 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vegetables price hike in retail market