विदर्भातील विविध जिल्ह्य़ांत आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठय़ा प्रमाणात भाज्यांचे नुकसान झाले आहे. बाजारपेठांमध्ये भाज्यांची आवक घटली असून भाव वाढू लागले आहेत. जवळपास सर्वच भाज्यांची सध्या ४० रुपये किलो प्रमाणे विक्री होत आहे. पावसामुळे मोठय़ा प्रमाणात भाज्या खराब झाल्या आहेत. खराब झालेल्या भाजीला बाजारात भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी मोठय़ा आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर येत्या दहा ते बारा दिवसात भाज्यांची आवक अत्यंत कमी होऊन भाज्यांचे भाव चांगलेच वाढणार असल्याची चिन्हे आहेत.
खरीप हंगामा अतिवृष्टी झाल्यानंतर त्यातून शेतकरी सावरत नाही तोच गेल्या दहा ते बारा दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्य़ांत आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे भाज्यांच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान आहे. पाऊस येण्याच्या आधी तोडून ठेवण्यात आलेल्या मालाची नासाडी झाली आहे. भाजीपालाही खराब झाला आहे. तो शेतकऱ्यांनी बाजारात विक्रीसाठी आणला असला मालाला उठाव नाही. अवकाळी पावसामुळे शेतातील झालेले नुकसान बघता शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज घेऊन पिकांची पेरणी करावी लागेल. मात्र, आधीचेच कर्ज न फेडल्यामुळे दुसरे कर्ज मिळणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. विदर्भातील विविध जिल्ह्य़ांसह राज्य आणि परराज्यातून कळमना मार्केट आणि कॉटेन मार्केटमध्ये भाज्या विक्रीसाठी येत आहेत. टमाटरची मोठय़ा प्रमाणात नासाडी झाल्याने त्याला भाव मिळत नाही. चिल्लर भाजी बाजारात बहुतेक भाज्या ४० ते ६० रुपये किलोप्रमाणे विक्रीला आहेत. काही भाज्या स्वस्त असल्या तरी त्यांची आवक बंद झाल्यानंतर भाव वाढण्याची शक्यता अनेक ठोक विक्रेत्यांनी व्यक्त केले. अडतिया संघाचे अध्यक्ष शेख हुसेन म्हणाले, गारपिटीनंतर जो माल येत आहे त्याला विशेष उटाव नाही. टमाटर, पालक, मेथीसह इतरही अनेक भाज्या खराब झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
एकीकडे महागाईने आधीच कळस केला असताना काही भाज्यांचे भाव दुपटीने वाढले आहेत. वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे भाज्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे भाज्यांची आवक कमी झाली आहे. नागपुरात येणारा भाजीपाला नागपूर जिल्ह्य़ातील आसपासच्या गावातून येत असला तरी आंध्रप्रदेश, नाशिक आणि विदर्भातील अन्य जिल्ह्य़ांतूनही भाज्यांची मोठय़ा प्रमाणात आवक केली जाते.
भाज्यांचे भावात वाढ झाली असल्याचे कॉटेन मार्केटमधील भाजी विक्रेता संघाचे सदस्य राजाभाऊ पत्राळे यांनी सांगितले. गारपिटीमुळे येत्या काही दिवसात भाज्यांची आवक कमी झाली तर पुन्हा लोकसभा निवडणुकीच्यावेळी भाज्या महाग होतील. रोज २० ते २५ ट्रक माल येत असताना गेल्या दोन ते तीन दिवसापासून केवळ १० ते १२ ट्रक माल आला आहे. पावसाने सडलेल्या भाज्या फेकून दिल्या जात आहेत, असेही पत्राळे यांनी सांगितले.
भाज्यांचे दर प्रती किलो
मेथी ४० ते ६० रुपये, टोमॅटो २० ते ३०, पालक २० ते ३०, भेंडी ४० ते ५०, चवळी ५० ते ६०, सिमला मिरची ४० ते ५०, कारले ४० ते ५०, काकडी ५० ते ६०, ढेमस ५० ते ६०, गाजर ३० ते ४०, तोंडली ४० ते ५०, कोहळे १५ ते २०, आले ६० ते ८० , लसूण ८० ते १००, मुळा ४० ते ६०, चवळी शेंगा ४० ते ५०, पत्ताकोबी २० ते ३०, फूलकोबी २५ ते ३०, सुरई ४० ते ५०, भेंडी ४० ते ५०, परवळ ४० ते ५०, गवार ३० ते ४०, लौकी ३० ते ४०, दुधीभोपळा ३० ते ४०, कोथींबीर ३० ते ४०, मिरची ३० ते ४०, कांदा ४० ते ५०, बटाटे ४० ते ६०, लिंबू प्रती नग २ रुपये.