वेकोलिमधील सर्वानी एकत्र येऊन उत्पादनाचे लक्ष्य गाठावे, असे आवाहन वेकोलिचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेशचंद्र गर्ग यांनी केले. वेकोलिच्या माजरी क्षेत्रात आयोजित खाण सुरक्षा पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. देशाची ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या साहसी कोळसा खाण कामगारांचे त्यांनी अभिनंदन केले. आपण सर्वानी एकत्र येऊन उत्पादनाचे लक्ष्य गाठावे. उत्पादनासोबतच सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे गर्ग म्हणाले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम विभागाचे खाण सुरक्षा उपमहासंचालक आर.बी. चक्रवर्ती उपस्थित होते. सुरक्षेसंबंधी केलेल्या उपाययोजनांबद्दल त्यांनी वेकोलिची प्रशंसा केली. व्यासपीठावर कंपनीचे तांत्रिक संचालक ओमप्रकाश, वित्त संचालक सुशील बहल, कार्मिक संचालक रूपक दयाल, संचालन समितीचे सदस्य मोहन झा, जी.व्ही.आर. शर्मा, सी.बी. फ्रॅँक, व्ही.एस. चौधरी, एस.एच. बेग, डी. सुब्बाराव, ए.जी. मुखर्जी उपस्थित होते.
वेकोलिच्या नागपूर विभागाला सर्वाधिक सुरक्षित विभाग म्हणून सन्याल मेमोरियल ट्रॉफी प्रदान करण्यात आली. डी.जे. देशमुख मेमोरियल ट्रॉफी मारुती सकारे यांना, भास्कर भट्टाचार्य मेमोरियल ट्रॉफी एस.व्ही. रामटेके, प्रकाश नंदन मेमोरियल ट्रॉफी गोडेगाव खाणीला प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व्ही.एस. चौधरी यांनी तर आभार ए.सी. सिंह यांनी मानले.

.

Story img Loader