छोटय़ा पडद्यावर ‘मिस्टर राम कपूर’ आणि ‘मिसेस प्रिया राम कपूर’ यांची खट्टी-मिठ्ठी नोकझोक पाहताना बायकांनी अगदी कडाकडा बोटे मोडून टीव्हीवरूनच त्यांची दृष्ट ओवाळून टाकली. ‘बडे अच्छे लगते है..वो राम ये प्रिया..’ असं म्हणता म्हणता ‘राम’ कधी मनात घर करून गेला हे लोकांनाही कळलं नाही. ‘राम’बद्दलचं हे वेड एवढय़ा वेगाने पसरत गेलं की ‘जाडा असला तरी मनानं कित्ती चांगला आहे.. नवरा हवा तर ‘राम’सारखाच..’असे संवाद घरोघरच्या नवऱ्यांनाही निमूटपणे ऐकावे लागले. खऱ्या राम कपूरला लोकांच्या या प्रेमाची त्याहीपेक्षा त्याच्याबद्दल असणाऱ्या तात्कालिक आकर्षणाची जाणीव आहे. पण, आपली पडद्यावरची प्रतिमा चांगली आहे की वास्तवात आपलं व्यक्तिमत्त्व खरोखरच कोणी प्रेमात पडावं असं आहे??? हे अजूनही त्याला नीटसं उमगलेलं नाही. त्यापेक्षा या प्रेमाच्या बळावर आपलं काम वाढवत न्यायचं एवढं साधं व्यावहारिक सूत्र पकडून त्याची पुढची वाटचाल सुरू आहे. ‘क सम से’नंतर कारकिर्दीला मिळालेलं वळण ते ‘उडान’नंतर घेतलेली बॉलिवुड भरारी..याविषयी ‘वीक पॉईंट’मध्ये सांगतोय ‘राम कपूर’
*    राम कपूर छोटय़ा पडद्यावर आधीपासून होता तरी लोकांनी ‘बडे अच्छे लगते है’ म्हणायला अंमळ उशीरच झाला नाही का?
‘बडे अच्छे लगते है’ ही मालिका तशी फार उशीरा आलेली आहे. माझ्या कारकिर्दीला खरं वळण मिळालं ते ‘कसम से’ या मालिकेमुळे. ‘कसम से’ मध्ये माझी जी जय वालियाची भूमिका होती ती लोकांना फारच आवडली. तोपर्यंत अशी कॉपरेरेट व्यक्तिरेखा लोकांना ग्लॅमरस वाटेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. ‘कसम से’ नंतर आणखी एक शो केला. पण, त्याआधी मी चित्रपटही केले होते. ‘हजारो ख्वाहिशे ऐसी’, ‘मान्सून वेडिंग’, ‘काल  यस्टर्डे अॅंड टुमॉरो’ हे माझे चित्रपट मधल्या काळात प्रदर्शित झाले होते. पण, नंतर फारसे चांगले चित्रपट हातात नव्हते. म्हणून ‘कसम से’ च्या निमित्ताने पुन्हा टीव्हीकडे परतलो. त्यातही मग ‘उडान’सारखा चित्रपट मिळाला आणि त्याचवेळी ‘बडे अच्छे लगते हैं’ मालिका सुरू झाली. या सगळया वेळेच्या गोष्टी आहेत. योग्य वेळी तुम्हाला योग्य ते मिळत असतं. तुम्हाला संयम ठेवून काम करत राहिलं पाहिजे. मी फक्त चांगल्या भूमिकांच्या मागे होतो मग तो टीव्ही असो किंवा चित्रपट..
*   टीव्ही कलाकार म्हणून जी लोकप्रियता मिळाली त्यामुळे तुला मोठय़ा पडद्यावर संधी मिळाली असं वाटतं का?
असं नेहमी म्हटलं जातं की टीव्ही हा चित्रपटांपर्यंत पोहचण्यासाठी एक महत्त्वाची पायरी आहे. काही अंशी ते खरंही आहे पण तितकंसं खरं नाही म्हणजे माझ्याबाबतीत तरी नाही. कारण, मी फक्त टीव्ही आणि मग फक्त चित्रपट असं केलेलंच नाही. मी दोन्हीकडे काम करत आलेलो आहे. ‘कसम से’ करण्या आधीही मी चित्रपट केलेच होते. त्यामुळे मला जी लोकप्रियता मिळाली आहे ती एक कलाकार म्हणून मिळाली आहे. एक अभिनेता म्हणून मिळाली आहे. मी कधीही स्वतला टीव्ही कलाकार किंवा चित्रपट कलाकार असं म्हणवून घेत नाही. मी एक चांगला अभिनेता आहे आणि कॅमेऱ्यासमोर गेलो की मी माझ्या भूमिकेत उतरतो. मग तो कॅमेरा टीव्ही मालिकेचं चित्रिकरण करत असेल नाहीतर सिनेमासाठी. माझ्या मते तुमचं काम चांगलं असेल तर लोकांना ते आवडतं.
*   लहानपणापासून अभिनेता व्हायचं ठरवलं होतं?
अमिताभ बच्चन यांची शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नैनितालच्या शेरवूड कॉलेजमध्ये मी शिकलो. तिथे नववीत शिकत असताना शाळेत सादर होणाऱ्या एका नाटकासाठी मला जबरदस्तीने ऑडिशन द्यावी लागली. ‘चार्लीज आंट’ नावाचं नाटक होतं ते. त्या नाटकानंतर अनेकांनी मला सांगितलं की तो छान अभिनय करतोस. कुठेतरी मला ते फार आवडून गेलं आणि मग छोटय़ा-मोठय़ा भूमिका करत राहिलो. पदवीपर्यंतचं शिक्षण पार पडेपर्यंत अभिनय हेच माझं ध्येय निश्चित झालं होतं. त्यामुळे मी अमेरिका गाठली आणि तिथे अभिनयाचं रीतसर शिक्षण घेतलं. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे मी एक प्रशिक्षित अभिनेता आहे. इथे या क्षेत्रात मी अपघाताने आलेलो नाही. मला नेमकं काय करायचं आहे, कोणत्या भूमिका करायच्या आहेत हे सगळं माझ्या मनात पक्कं आहे.
*    सध्या तू यशराजच्या ‘मेरे डॅड की मारूती’ या चित्रपटात काम करतो आहेत त्याविषयी काय सांगशील?
‘मेरे डॅड की मारूती’ या चित्रपटात मी एका साध्या पण खडूस बापाच्या भूमिकेत आहे. मला आपल्या देशाविषयी, मूल्यांविषयी फार प्रेम आहे. म्हणून मी गाडीसुध्दा भारतीय बनावटीती मारूती वापरतो. माझं मारूती गाडीवर एवढं प्रेम आहे की मी मुलीच्या लग्नात जावयाला भेट देण्यासाठी नवी कोरी मारूती गाडी खरेदी करतो आणि माझा मुलगा हीच गाडी आपल्या प्रेयसीला पटवण्यासाठी चोरतो. असं गंमतीदार कथानक आहे.

*    आजच्या काळात..मारूती गाडी..
गंमत सांगतो, चित्रपटासाठी हे नाव मीच सुचवलं आहे. या चित्रपटातली जी व्यक्तिरेखा आहे ती स्वतच्या तत्त्वांची पाठराखण करणारी आणि मनाने ऐंशीच्या दशकात जगणारी आहे. त्यामुळे त्याचं आपलं सतत माझी मारूती..माझी मारूती असं सुरू असतं. बरं ही व्यक्तिरेखा पंजाबी आहे आणि मी स्वत सच्चा पंजाबा.आहे. त्यामुळे जर मी त्या जागी असतो तर मेरी मरूत्ती.असा काहीसा पंजाबी हेलातला माझा उच्चार असता. चित्रपटाविषयी चर्चा सुरू असताना मी हे पंजाबी हेल काढून म्हणून दाखवलं ते प्रॉडक्शनला इतकं आवडलं की ‘मेरे डॅड की मारूती’ या मी सुचवलेल्या नावावर त्यांनी शिक्कामोर्तब करून टाकलं..
*   त्याचं आणखी एक कनेक्शन असंही
आहे की..
मी जेव्हा तरूण होतो तेव्हा मी पण माझ्या वडिलांची गाडी त्यांना न सांगता फिरवायला न्यायचो. म्हणजे पंचवीस वर्षांचा असताना मी पहिल्यांदा माझ्या वडिलांची गाडी फिरवायला घेऊन गेलो होतो. त्यांच्याकडे फियाट होती आणि कॉंटेसा होती. मी या दोन्ही गाडय़ा त्यांना न सांगता नेल्या आणि धडक देऊन त्याची मोडतोडही केली होती. ती आठवण कुठेतरी या चित्रपटाशी नकळतपणे जोडली गेली. योगायोग म्हणजे मी माझी पहिली गाडी घेतली होती तीही मारूतीच होती..
*   तुझा मानधनाचा आकडाही मोठा
असतो म्हणे..
मानधनाचे आकडे प्रत्येक चित्रपटागणिक, मालिकेनुसार वेगवेगळे असतात. त्याच्याविषयी फार काही बोलण्यासारखं नाही. मला एक गोष्ट माहिती आहे की ही माझ्यासाठी योग्य वेळ आहे, योग्य परिस्थिती आहे. जेव्हा मी केलेल्या कामासाठी मला खणखणीत मोबदला मिळू शकतो आणि तसं मी करतो आहे.
*    पण, टीव्हीवर सतत दिसणारा कलाकार सिनेमामध्ये फारसा लोकप्रिय होत नाही. तुझ्या यशाने हेही समीकरण बदलले आहे..
मी एकटा नाही तर रोनित रॉय, सुशांतसिंग राजपूत असे टीव्ही कलाकार आहेत ज्यांना आज चित्रपटातही तितकीच लोकप्रियता मिळते आहे. मी आणि रोनित एकाचवेळी टीव्ही-चित्रपट माध्यमातून काम करतो आहोत तरीही दोन्ही ठिकाणी आम्हाला तितकंच यश मिळतं आहे. टीव्ही आणि चित्रपट यांच्यातलं अंतर आता गळून पडलेलं आहे. दहा वर्षांपूर्वी जी परिस्थिती होती ती आत्ता राहिलेली नाही. आज टीव्ही इंडस्ट्री इतकी झपाटय़ाने विस्तारली आहे की बॉलिवुडलाही त्याची दखल घ्यावी लागली आहे. अमिताभ बच्चन, करण जोहर सगळ्यांनाच या इंडस्ट्रीचं गणित कळायला लागलं आहे. येत्या काही वर्षांंत अमेरिकन टीव्हीप्रमाणे भारतीय टीव्ही असेल यात शंका नाही.
*   तुला तुझ्या वाढत्या वजनाविषयी चिंता नाही वाटत..
वजन..यात दोन वेगवेगळे
दृष्टिकोन आहेत. एक कलाकार म्हणून विचाराल तर मला नाही वाटत. कारण, मी जसा आहे तसंच
मला लोकांनी आणि चित्रपटकर्त्यांनीही स्वीकारलेलं आहे. म्हणजे अमजद खान, संजीव कुमार असेच होते तरी ते लोकप्रिय होते. आणि मलाही काही हिरोच्या भूमिका करायच्या नाहीत. मी करतोय त्या चरित्र व्यक्तिरेखा आहेत. त्याचा संबंध फक्त माझ्या अभिनयाशी आहे. त्यामुळे कलाकार म्हणून मी वजन घटवण्याचे प्रकार करणार नाही. वैयक्तिक पातळीवर दोन मुलांचा बाप म्हणून मला फरक पडतो. कारण, माझ्या पत्नीला आणि मुलांना माझ्या तब्येतीची काळजी वाटते. त्यांच्यासाठी म्हणून तंदुरूस्त रहावं, असं मला वाटतं.
पंजाबियांदी बॅटरी चार्ज रहें.. या ‘मेरे डॅड की मारूती’ चित्रपटातील गाण्याप्रमाणेच राम कपूरची बॅटरीही एकदम चार्ज आहे. माझ्याबद्दल बायकांना आकर्षण वाटतं हे मला कळतं. पण, जेव्हा मला ‘सेक्सी’ किंवा ‘हॉट’ म्हणून संबोधलं जातं तेव्हा वेड लागायची पाळी येते. कुठल्याही कोनातून पाहिलंत तरी मी तसा दिसत नाही. सुडौल, सुंदर वगैरे शब्दांशी माझा दूरदूरचा संबंध नाही, अशी कबूली देतानाच आता मी ठरवलं आहे की या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण करायचा नाही, असे सांगून तो मोकळा होतो. लोकांना आपण आवडतो आहोत, हेच खरं आहे ते मनात जपायचं आणि मरेपर्यंत चांगलं काम करायचं..असं ‘मिस्टर कपूर’ यांनी पक्कं ठरवून टाकलं आहे.
रेश्मा राईकवार