जागतिक आर्थिक मंदीचे होणारे दूरगामी परिणाम, देशात वाढलेली महागाई आणि विविध प्रकारचे वाढलेले कर, परिणामी बांधकाम सहित्यात झालेल्या दरवाढीमुळे व्याजाने पैसे घेऊन इमले बांधणाऱ्या बिल्डरांचे कंबरडे मोडू लागले असून या कर्जापासून सुटका करून घेण्यासाठी रोख देणाऱ्या ग्राहकांना कमी भावात घरे देण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे रोख पैसे असतील तर ‘घ्या स्वस्त आणि मस्त घर’ अशी स्थिती महानगरांमध्ये निर्माण झाली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे या बडय़ा शहरांत बिल्डरांनी ग्राहकांना पायघडय़ा घातल्या असून सवलती जाहीर केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाने स्वत:चे चांगभलं करणाऱ्या नवी मुंबईतील बिल्डरांमध्ये तर भाव कमी करण्याची जणू काही स्पर्धा लागली आहे.

अमेरिका, युरोप खंडात आलेल्या आर्थिक मंदीचे परिणाम देशात गेल्या वर्षीपर्यंत जाणवत नव्हते, पण आता या आगीची झळ चांगलीच बसू लागली असून तिचे पहिले चटके रिअल इस्टेटला जाणवू लागले आहेत. जागतिक पातळीवरील या मंदीबरोबरच देशातील महागाई, पेट्रोल, डीझेलचे वाढते दर, विविध प्रकारच्या करात झालेली वाढ यामुळे  ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यात राज्यात या वर्षांपासून लागू करण्यात आलेली एलबीटीची नवीन प्रणाली, यामुळे बांधकाम व्यवसायिकांचे कंबरडे मोडू लागले असून फायनान्सर, वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था किंवा बँकांकडून कर्ज घेऊन बांधकाम करणारे बिल्डर आता अधिक तग धरू शकणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बँकांची किंवा फायनान्सरची देणी देण्यासाठी कमी दरात घरे विकण्याची तयारी या बिल्डरांनी सुरू केली आहे. मेट्रो, विमानतळ, एसईझेडसारख्या प्रकल्पांची परदेशी छायाचित्र छापून घरांचे दर अवाच्या सव्वा वाढवणारे बिल्डर आता ग्राहकाने रोख रक्कम त्वरित देण्याची तयारी केल्यास कमी भावात घर विकत असल्याचे दिसून येते. आर्थिक मंदीच्या या माहोलमधून बाहेर पडण्यासाठी बिल्डर कमी दराने घरे, दुकाने विकत असल्याच्या वृत्ताला बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबईचे अध्यक्ष एन. सी. सनी यांनी दुजोरा दिला. ग्राहकांना कर्ज तात्काळ मंजूर होणार असेल तर हे बिल्डर ४०० ते ५०० रुपये (प्रति चौ.फू) कमी दराने घर विकत आहेत. नवी मुंबईत सध्या चार हजार ते दहा हजार रुपये प्रति चौरस फूट दराने घरे विकली जात आहेत. नवी मुंबईत १०० पेक्षा जास्त नवीन इमारतींचे काम खारघर, पनवेल, उलवा, द्रोणागिरी, कामोठे, तळोजा, पाचनंद, नेरे या परिसरांत सुरू आहे. या भागांत जमिनीचा भाव जास्त असल्याने बिल्डरांनी घरांच्या किमती जरा जास्तच ठेवल्या आहेत. त्यात बांधकाम साहित्याच्या दरात झालेल्या दरवाढीमुळे बांधकामाच्या किमतीतही वाढ झाली आहे. सर्वसाधारपणे जास्तीतजास्त १५०० प्रति चौरस फुटात बिल्डर बांधकाम करीत होते. ती किंमत आता ५०० रुपये प्रति चौरस फुटाने वाढली आहे. जमिनीची किंमत अधिक बांधकाम खर्च आणि नफा ठरवून बिल्डर या किमती जाहीर करीत होते. त्यात नफ्याचा हिस्सा जास्त असल्याने या किमती गगनाला भिडत आहेत, पण आता बँकांचे हप्ते भरायचे असल्याने या नफ्यावर बिल्डर तुळशीपत्र ठेवण्यास तयार आहेत.
ज्या बिल्डराकडे पैसे मुबलक आहेत तो बिल्डर या मंदीचा सामना करू शकतो, पण ज्यांनी कर्जावर आपले इमले उभारले आहेत त्यांना पुढील काळ जड जाणार असल्याचे कामधेनु रिअलटरच्या सुरेंद्र सबलोक यांनी सांगितले. देशात येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर (निवडणुकीत सर्वाधिक काळा पैसा बाजारात येत असतो.) हे चित्र बदलू शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Story img Loader