मुख्यमंत्र्यांच्या पॅकेजवर विदर्भात संतप्त प्रतिक्रिया
गेल्यावर्षी कोरडा दुष्काळ आणि यावर्षीचा ओल्या दुष्काळामुळे शेतक ऱ्यांची अवस्था फारच गंभीर झाली आहे. राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी घोषित केलेले पॅकेज अतिशय तोकडे असून त्यातून त्यांची नुकसान भरपाई भरून निघणार नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी विदर्भात अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला असला तरी शेतक ऱ्यांपर्यंत ते पोहोचले नाहीत. शेतक ऱ्यांची व्यथा काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे शेतक ऱ्यांचा झालेल्या नुकसानाची अंदाज नाही. शेतक ऱ्यांना यावेळी आर्थिक मदत केली नाही तर येणाऱ्या काळात आत्महत्या वाढतील. विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्यामुळे त्यांना पॅकेज वाढवून द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष राम नेवले यांनी केली.
विदर्भाचा धावता दौरा करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मुंबईत गेल्यानंतर प्रशासनाने अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत अहवाल सादर केले. या अहवालांमध्ये अनेक जिल्ह्य़ांत नुकसान कमी दाखविले असल्याने ७० टक्के पूरग्रस्त व शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. विदर्भात अजूनही सर्वदूर पाऊस सुरू च आहे. जवळपास २० हजार कोटींचे गरिबांचे व शेतक ऱ्यांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीग्रस्तांना सरकार मदत देणार असले तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार मिळणारी मदत तोकडीच आहे. विदर्भातील सर्व पूरग्रस्तांना मदत मिळण्याची आवश्यकता आहे. या पॅकेजसोबतच सरकारने अन्न सुरक्षा, आरोग्य सुरक्षा व कर्जाच्या पुनर्वसनाबाबतही निर्णय घ्यायला हवा होता. चंद्रपूर, वर्धा, वाशीम जिल्ह्य़ांत मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने अजूनही सर्वेक्षणाचे काम सुरूच ठेवावे, सर्व पूरग्रस्तांना मदत मिळवी हीच आजची गरज आहे. विदर्भात ५२ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. पाऊस असाच सुरू राहिल्यास संपूर्ण खरीप हंगाम संपल्याची नोंद होईल, असे विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी म्हणाले.
शेतक ऱ्यांचे झालेले नुकसान बघता या पॅकेजमुळे शेतक ऱ्यांना दिलासा मिळेल. राज्य सरकारने यापूर्वी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. शहरात मोठय़ा प्रमाणात अतिवृष्टी झाली असून त्यातही मोटय़ा प्रमाणात लोकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागातील नुकसानग्रस्त लोकांसाठी स्वतंत्र पॅकेज घोषित करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे शहर अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता यांनी केली आहे.
या पॅकेजमुळे शेतकऱ्यांना मदत होणार असली तरी ही मदत अतिशय अपुरी आहे. शरद पवार यांनी दुष्काळग्रस्त शेतक ऱ्यांना यापूर्वी मदत केली असून त्यांनी या पॅकेजसाठी पुढाकार घेतला आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी अजून एकदा दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून सर्वेक्षण करावे आणि प्रत्येक नुकसानग्रस्त शेतक ऱ्याला मदत मिळाली पाहिजे, यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजय पाटील यांनी केली.
मुख्यमंत्र्यांचे पॅकेज म्हणजे त्यांच्या तोडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. ज्या प्रमाणात शेतक ऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. हजारो शेतक ऱ्यांचे पुरामुळे संसार उद्ध्वस्त झाले. केवळ घरे पडली नाही तर दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अनेक वस्तू या पुरात वाहून गेल्या आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला किमान १० लाख रुपये मदत केली पाहिजे.
या पॅकेजचा शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही, अशी टीका शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष शेखर सावरबांधे यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा