जॉबकार्ड असल्याशिवाय मजुरांना यापुढे काम मिळू शकणार नाही. जिल्ह्य़ात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांच्या जॉबकार्डची मुदत मार्चमध्ये संपली. नूतनीकरणानंतर ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, जॉबकार्ड नूतनीकरणाचे काम कासवगतीने चालू असल्याने जॉबकार्डशिवाय मजुरांच्या कामाचा प्रश्न अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे.
रोहयोअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांकडे आता जॉबकार्ड असणे बंधनकारक केले आहे. पूर्वी ज्या मजुरांकडे जॉबकार्ड होते, त्याची मुदतवाढ मार्चमध्ये संपली. त्यानंतर ३१ मेपर्यंत जॉबकार्ड नूतनीकरणाची मुदत वाढवून देण्यात आली.
 जिल्ह्य़ातील पाच तालुक्यांमध्ये पंचायत समिती स्तरावर १५ हजार ४१७ जॉबकार्ड नूतनीकरण, तर १८६ ई-मस्टर नोंद झाले. सुमारे ५२ हजार मजुरांकडे छायाचित्र काढल्याची नोंद आहे. जिल्ह्य़ात किमान ६३ हजार १०० मजुरांकडे जॉबकार्ड अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ १५ हजार १९५ मजुरांकडे जॉबकार्ड आहे. दि. ३१ मेपर्यंत किती मजुरांकडे जॉबकार्ड असतील, हा उत्सुकतेचा विषय आहे. जॉबकार्डसाठी वितरित केलेल्या प्रपत्रांची संख्या जवळपास एक लाख आहे. ज्या मजुरांकडे जॉबकार्ड आहे, अशा मजुरांच्या बँक खात्यावर कामाचे दाम जमा होणार आहे. त्यामुळे कामात होणाऱ्या गैरव्यवहारांना निश्चित आळा बसेल. त्यासाठी मजुरांना काम पाहिजे असल्यास त्यांच्याकडे जॉबकार्ड असणे बंधनकारक आहे.

Story img Loader