राजकीय, सहकार, सामाजिक क्षेत्रांतील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व माजी खासदार अ‍ॅड. उत्तमराव नथुजी ढिकले यांना बुधवारी भावपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. या वेळी राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शोकाकुल वातावरणात भडाग्नी देण्यात आला. या वेळी अनेकांना आपल्या भावना अनावर झाल्या. दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, माजी आमदार बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी रात्री अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.
अ‍ॅड. ढिकले यांना रविवारी सायंकाळी हृदयविकारामुळे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. या घटनेची माहिती समजल्यानंतर मनसेच्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी पंचवटीतील निवासस्थानी गर्दी केली.
जिल्हय़ातील राजकीय, सहकार क्षेत्रांत ढिकले यांचे मोलाचे योगदान होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे रात्री नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांच्यासह मनसेच्या माजी आमदारांनी ढिकले यांचे अंत्यदर्शन घेतले.
बुधवारी सकाळी सजविलेल्या वाहनातून निवासस्थानापासून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. या वेळी ढिकले यांच्या चाहत्यांची अलोट गर्दी लोटली.
काळाराम मंदिरमार्गे गणेश वाडी, देवी मंदिर रोडमार्गे ही यात्रा अमरधाममध्ये पोहोचली. पार्थिवाचे मान्यवरांनी साश्रुपूर्ण नयनांनी दर्शन घेत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी अ‍ॅड. ढिकले हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते, असे नमूद करत ५० वर्षांच्या काळात त्यांनी राजकारणात स्वतंत्र ठसा उमटवल्याचे सांगितले.
आपल्या कार्यशैलीने ते अनभिषिक्त सम्राट ठरले. राजकारणासह सहकार, शिक्षण, साहित्य आदी क्षेत्रांतील वावर त्यांचे व्यक्तिमत्त्व फुलवत गेला. निवडणुका आणि त्यातील विजय हे ढिकले यांच्यातील अंगभूत कौशल्याने सहज शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
महापौर अशोक मुर्तडक, आ. बाळासाहेब सानप, माजी आमदार बबन घोलप, उपमहापौर गुरुमीत बग्गा आदींनी श्रद्धांजली अर्पण केली. अ‍ॅड. ढिकले यांच्या कार्याची माहिती प्रा. हरीष आडके, शांताराम रायते व मधुकर झेंडे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा