रेल्वेच्या धडकेत जखमी झालेल्या वाघिणीच्या मादी बछडय़ाच्या पायात रॉड टाकण्याचा यशस्वी प्रयोग नागपुरातील पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी केला. मात्र, आता त्याच पशुवैद्यकीय तज्ज्ञांना तिच्या वैद्यकीय तपासणीसाठी डावलण्यात आल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे त्या वाघिणीचा जीव महत्त्वाचा की वनखात्याची मर्जी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेमार्गावर एप्रिल २०१३ मध्ये रेल्वेच्या धडकेत एका मादी बछडय़ाचा जागीच मृत्यू तर एक जखमी झाला होता. तत्परतेने या जखमी बछडय़ाला नागपुरात आणले गेले आणि येथील पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या चमुने तिच्यावर यशस्वी उपचारही केले. तत्कालीन प्रधान मुख्य वनसंरक्षक डी.सी. पंत यांनी त्यांच्या कार्यकाळात अशाप्रकारच्या रेस्क्यू ऑपरेशनसाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठासोबत करार करून तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू तयार केली. यात पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या पशु औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. एन.पी. दक्षिणकर, संशोधन विभागाचे उपसंचालक व शल्यचिकित्सक डॉ. एस.व्ही. उपाध्ये, सहाय्यक प्राध्यापक डॉ. व्ही.एम. धूत व डॉ. जी.आर. भोजने यांची नियुक्ती करण्यात आली होती. या चमुने वाघिणीच्या बछडय़ावर केवळ उपचारच केले नाहीत तर तिच्या पायात रॉड टाकण्याचा पहिला यशस्वी प्रयोगही केला. तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या प्रयत्नांमुळे अवघ्या काही महिन्यातच हा मादी बछडा चालायला लागला. मात्र, तेव्हापासून तर आतापर्यंत तिची वैद्यकीय तपासणीच झाली नसल्याची बाब समोर आली आहे.
पायातील रॉडच्या यशस्वी प्रयोगानंतर त्याचवेळी वैद्यकीय तपासणी केली असती, तर प्राणिसंग्रहालयात किंवा अभयारण्यातही तिला सोडण्याचा निर्णय घेता आला असता.
या संदर्भात आठ महिन्यापूर्वी प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी त्या बछडय़ाच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले, पण नागपूर विभागाकडून या आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आले. विभागाच्या पशुवैद्यक अधिकाऱ्यांनीसुद्धा त्याची दखल घेतली नाही. त्यानंतर चार महिन्यापूर्वी पुन्हा एकदा प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी वैद्यकीय तपासणीचे आदेश काढले. या आदेशालाही अव्हेरत चार महिन्यानंतर विभाग जागे झाले. तीन दिवसांपूर्वी विभागाच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी अलंकार पॉलिक्लिनिकमध्ये तिची वैद्यकीय तपासणी करण्याचे ठरवले. मात्र, यात तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनाच डावलण्याचा प्रकार विभागाच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला. त्यांना डावलून इतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले, पण ते देखील गैरहजर असल्यामुळे वैद्यकीय तपासणी पुन्हा एकदा रखडली.
करारानुसार तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमुला वैद्यकीय तपासणीसाठी बोलावणे आवश्यक होते, हे उपवनसंरक्षक भट यांनी मान्य केले. विभागाच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चित्रा राऊत यांनी आम्ही तसे निर्देशही दिले होते, पण हा आदेश अव्हेरला गेला. येत्या चार-पाच दिवसात उपचार करणाऱ्या तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमुला पाचारण करून ही वैद्यकीय तपासणी करण्यात येईल, असे भट म्हणाले.
जखमी वाघिणीच्या उपचारांपासून तज्ज्ञांना डावलले
रेल्वेच्या धडकेत जखमी झालेल्या वाघिणीच्या मादी बछडय़ाच्या पायात रॉड टाकण्याचा यशस्वी प्रयोग नागपुरातील पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी केला. मात्र, आता त्याच पशुवैद्यकीय तज्ज्ञांना तिच्या वैद्यकीय तपासणीसाठी डावलण्यात आल्याची बाब समोर आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-08-2014 at 08:24 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veterinary doctors did not allow to treat female tiger in nagpur