प्रशासनावर संगनमताचा आरोप
महापालिकेच्या पारगमन कराची वसुली करणाऱ्या विपूल ऑक्ट्रॉय या ठेकेदाराच्या विरोधात उपमहापौर गीतांजली काळे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना एक निवेदन पाठवले आहे. त्यात संबंधित ठेकेदार व मनपाच्या अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याची शंका व्यक्त करून मनपाच्या पारगमन ठेका प्रक्रियेच्या चौकशीची मागणी केली आहे.
आयुक्त विजय कुलकर्णी यांनाही त्यांनी याबाबतचे पत्र देऊन त्यात प्रशासन संबंधित ठेकेदाराला पाठिशी घालत असल्याची टिका केली आहे. वारंवार तक्रारी करूनही त्याच्यावर प्रशासन कसलीही कारवाई करत नाही, याचा सरळ अर्थ त्याला प्रशासनाचा पाठिंबा आहे असाच होतो, त्यामुळे येत्या ७ दिवसांत कारवाई केली नाही तर प्रशासनाच्या विरोधात थेट न्यायालयात दाद मागण्याचा इशारा श्रीमती काळे यांनी आयुक्तांना दिला आहे. विपूलच्या कर्मचाऱ्यांकडून जादा दराने पारगमन कर वसूल केला जात आहे, परप्रांतीय वाहनांच्या चालकांना दमदाटी, प्रसंगी मारहाण केली जाते, त्यातून मनपाची बदनामी होत आहे, असे श्रीमती काळे यांचे म्हणणे आहे. त्यासाठी त्यांनी मारहाण झालेल्या काही चालकांसमवेत आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे काही महिन्यांपूर्वी तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एका नाक्यावर विपूलचे कर्मचारी जादा दराने कर वसूल करत असल्याचे निदर्शनास येऊन तब्बल ६ कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी खंडणीचा गुन्हाही दाखल केला होता. ८ डिसेंबरला नगर-सोलापूर रस्त्यावर एका परप्रांतीय वाहनचालकाला नाक्यावरच्या विपूलच्या कर्मचाऱ्यांनी जबर मारहाण केली, याकडे श्रीमती काळे यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.
वारंवार असे प्रकार होत असून व ते निदर्शनास आणून देऊनही प्रशासन ठेकेदाराला यासंबंधी साधा खुलासाही विचारायला तयार नाही. त्यामुळे ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांचे धैर्य वाढत चालले आहे. यातून मनपाची नाहक बदनामी होत आहे. त्यामुळे येत्या ७ दिवसांत जादा दराने वसुली होत असल्याची चौकशी करावी, दोषी आढळणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करावी व त्याचा अहवाल त्वरित द्यावा; अन्यथा न्यायालयात दाद मागू, असे उपमहापौर काळे यांनी म्हटले आहे.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा