अंदाजपत्रक मंजूर होऊन सात महिने झाले तरीही त्यातील लेखाशीर्षांप्रमाणे कामांवर खर्च होत नसल्याबद्दल उपमहापौर गीतांजली काळे यांनी उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे यांच्याकडे आज तीव्र नाराजी नोंदवली. प्रशासनाच्या कामकाजातील इतरही अनेक त्रुटी त्यांनी निदर्शनास आणल्या.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किशोर डागवाले, गणेश भोसले, तसेच सत्तेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी असलेल्या मतभेदातून कागदोपत्रीच सेनेचेच राहिलेले अंबादास पंधाडे हेही त्यांच्यासमवेत होते. या सर्वानी प्रशासनाच्या दुर्लक्षाचा निषेध करणारे निवेदनच डॉ. डोईफोडे यांना दिले. आरोग्य, उद्याने, कचरा संकलन, भटकी कुत्री अशा अनेक गोष्टींकडे मनपा प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे त्यांनी म्हटले असून यात सुधारणा करावी, अशी मागणी केली आहे.
आरोग्य, पाणीपुरवठा, विद्युत, बांधकाम या महत्वाच्या विभागांवर आतापर्यंत अंदापत्रकातील तरतुदींच्या फक्त ३० टक्के खर्च झाला आहे. नगरसेवकांच्या प्रभागातील त्यांनी सुचवलेली कामे केली जात नाहीत, सर्वसाधारण सभेत मंजुरी दिलेल्या कामांनाही सुरूवात केली जात नाही. नगरोत्थानची फक्त चर्चा, बैठका व घोषणाच सुरू आहेत, प्रत्यक्षात एकाही कामाला अद्याप सुरूवात नाही, शहर पाणी पुरवठा सुधार योजनेचे कामही गजगतीने सुरू आहे, अशी टिका करून याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.