साधारण पाच वर्षांपूर्वी ‘स्लमडॉग मिलेनियम’ या गाजलेल्या चित्रपटातील बालकलाकार आणि ‘सारेगम लिटल चॅम्प’ या गायन स्पर्धेतील प्रमुख कलाकारांचा जाहीर सत्कार जालना शहरात आयोजित केला होता. युवा क्रिकेट खेळाडू विजय झोल याचाही या वेळी सत्कार करण्यात आला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी विजय एक दिवस भारताच्या राष्ट्रीय संघात खेळताना दिसेल, असे भाकीत केले होते. मित्राचा मुलगा असल्यामुळे खोतकर यांनी हा आशावाद व्यक्त केल्याचे त्या वेळी काहींना वाटले होते. परंतु हे भाकीत नंतर प्रत्यक्षात उतरले. जेथे अद्याप ‘टर्फ विकेट’ नाही, अशा जालना शहरातील विजय झोलकडे आता भारतीय युवा संघाचे कर्णधारपद आले आहे.
जिल्हा, विभागीय व राज्य क्रिकेट स्पर्धात सहभागी होऊन फलंदाजीत आपली चमक दाखविणारा विजय २०११मध्ये खऱ्या अर्थाने या क्षेत्रात दखलपात्र ठरला. त्या वेळी नाशिकमध्ये १९ वर्षांखालील स्पर्धेत आसामविरुद्ध त्याची खेळी क्रीडाप्रेमींना आश्चर्यात टाकणारी होती. या सामन्यात विजयने ४६७ चेंडूंत ४५१ धावा तडकावल्या. या विक्रमानंतर विजयचे माध्यमांतून मोठे कौतुक झाले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. यशाची कमान चढतीच ठेवली. युवा संघाच्या विश्वचषक स्पर्धेत भारताकडून खेळताना त्याने ६ सामन्यांमध्ये १५१ धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलियात झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारताने अजिंक्यपद पटकावले. या संघात विजयने महत्त्वाची भूमिका बजावली. विश्वचषक जिंकून आल्यावर जालना शहरात त्याचे जोरदार स्वागत होऊन मिरवणूक काढण्यात आली. अन्य कोणत्याही सामन्यात काय, अगदी जालना जिल्हा संघाच्या नेतृत्वाची संधीही न मिळालेला विजय आता भारतीय युवा संघाची धुरा सांभाळणार आहे. जूनच्या अखेरपासून ऑस्ट्रेलियात होणाऱ्या तिरंगी क्रिकेट स्पर्धेत तो प्रथमच भारताचे नेतृत्व करणार आहे. ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंडचा संघ या स्पर्धेत आहे. ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव यापूर्वी त्याने घेतला. या वेळेस ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाण्याची त्याची तिसरी वेळ आहे.
‘आयपीएल’मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात झालेली निवड विजयला महत्त्वाची वाटते. या संघात सहभागी असलेल्या नामवंत व अनुभवी खेळाडूंचा सहवास लाभला. त्यातून बरेच काही शिकायला मिळाले. त्याच्या निमित्ताने भारताच्या युवा संघाचे कर्णधारपद प्रथमच महाराष्ट्राकडे आले. साहजिकच क्रिकेट रसिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. दर्जेदार खेळासाठी आवश्यक सोयीसुविधा महत्त्वाच्या असल्या, तरी प्राप्त स्थितीत जे काही उपलब्ध आहे, त्या आधारेच परिश्रम करून तो कर्णधारपदापर्यंत पोहोचला आहे. विजयचे वडील हरिश्चंद्र झोल जिल्हय़ातील नामांकित फौजदारी वकील आहेत. कोणत्याही क्षेत्रात असाधारण यश मिळवायचे असेल, तर खडतर मेहनत घ्यावीच लागते, असे हरिभाऊ झोल म्हणतात. विजयचाही वडिलांप्रमाणेच खडतर परिश्रमावर विश्वास आहे.
बंगळुरू येथे संभाव्य युवा संघाच्या सराव शिबिरादरम्यान त्याच्या कर्णधारपदी निवडीची घोषणा निवड समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पंडित यांनी केली. डावखुरा फलंदाज असलेल्या विजयचे लक्ष कर्णधार म्हणून टाकलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडण्यावरच असेल. आपल्या संघात चांगले खेळाडू असून त्यांच्या सहकार्याने शंभर टक्के यशासाठी प्रयत्न करायचे आहेत.
यापूर्वी चौरंगी स्पर्धेसाठी व १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठी केलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा अनुभव पाठीशी असून त्याचा मोठा उपयोग या वेळेस होईल, असे विजय सांगतो. कर्णधारपद काटेरी मुकुटासारखे असते आणि या नव्या जबाबदारीचे आव्हान पेलण्यास तो सज्ज झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा