अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर जमिनी पाण्याखाली येऊन विदर्भातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाचे नेते, मंत्री व प्रत्यक्ष केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पूरग्रस्त क्षेत्राची पाहणी केली. पंचनाम्याचे काम पूर्ण झाल्यावर शंभर दिवसांच्या आत शेतकऱ्यांना मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले, मात्र अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मदत पोहचली नाही.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा गेल्या दोन महिन्यांपूर्वी दौरा झाला, परंतु त्यांनी पूरग्रस्त विदर्भातील शेतकऱ्यांबद्दल शब्दही काढला नाही. सोनिया गांधी यांचाही दौरा वाया गेला. विदर्भातील शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर चढला असून ते आत्महत्येस प्रवृत होत आहेत. आतापर्यंत जवळपास साडेतीन हजारच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारी २०१२ ते ऑक्टोबर २०१३ पर्यंत जवळपास १७६ आत्महत्यांची नोंद अधिकृतरित्या प्राप्त झाली आहे. दर महिन्याला अंदाजे ७ ते १० शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबातील सदस्य उघडे पडले आहेत. दिग्रस तालुक्यातील एक शेतकरी ज्ञानेश्वर लोखंडे आजारी असून कर्जबाजारी आहेत. त्यांनी नुकसान भरपाईची मागणी अनेकदा शासनाकडे केली, उपोषण केले, परंतु शासनाने त्यांना कुठलाही न्याय दिला नाही. खासदार दत्ता मेघे यांनी त्यांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली व जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या प्रकरणाची त्वरित सुनवाई करण्याचे पत्र दिले तरीही अद्याप सुनवाई झाली नाही. असे एक ना अनेक प्रकरणे विदर्भात गाजत आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत जिल्ह्य़ातील भाजपचे नेते प्रशांत इंगळे, मिलिंद भेंडे, जयंत कावळे. चंदन गोस्वामी उपस्थित होते.

Story img Loader