विदर्भात अनेक जिल्ह्य़ांना दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या असून बादलीभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. भविष्यात पाणीप्रश्न आणखी गंभीर होण्याचे संकेत मिळाल्यानंतरही जलसंधारणातील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या पावसाळी पाण्याच्या पुनर्वापराकडे महापालिका व जिल्हा परिषद प्रशासन तसेच नागरिक गांभीर्याने लक्ष देत नाहीत. शहरात मोठय़ा प्रमाणात सुरू असलेले बांधकाम पाहता पाण्याच्या अपव्ययाचे प्रमाण यंदा अधिक आहे.
पाणी टंचाई आली की विहीर खोदण्याचे काम केले जाते. पण, पावसाळी पाण्याच्या पुनर्वापरासाठी उन्हाळ्यातच तयारी करण्यात शासकीय यंत्रणा उदासीन आहे. गेल्या काही वर्षांपासून नागपूर शहराच्या अनेक वस्त्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई असताना अनेक प्रयत्न प्रशासनाने केले. पावसाळ्यात पाणी साठवून त्याच्या पुनर्वापराबाबत पाण शहरात सक्ती केली गेली नाही. शहरात मोठय़ा प्रमाणात बांधकाम होत आहे.
पण, पावसाळी पाण्याचा साठा करण्यास बांधकाम व्यावसायिक व वैयक्तिक बांधकाम करताना नागरिक दुर्लक्ष करतात. नगर रचना खातेही याकडे गरजेकडे कानाडोळा करीत आहे. विकास नियमावलीत नव्या बांधकामांना परवानगी देताना पावसाळी पाण्याचा पुनर्वापर (रेनवॉटर हार्वेस्टिंग) अनिवार्य असूनही हा महत्त्वाचा पैलू दुर्लक्षित आहे.
रेनवॉटर हार्वेस्टिंगची सोय उन्हाळ्यात केली जाऊ शकते. महापालिकेने किमान त्यांच्या ताब्यातील सार्वजनिक जागांवर रेनवॉटर हार्वेस्टिंगची सोय करण्याची गरज आहे. पण, तसे होताना दिसत नाही. नव्या बांधकामांना परवानगी देताना रेनवॉटर हार्वेस्टिगची सक्ती केल्यास पावसाचे वाहून जाणारे पाणी साठविण्यात मोलाची मदत होईल. ग्रामीण भागात शिवकालीन पाणीसाठवण योजना अस्तित्वात असताना यात कुठलेही ठोस काम होताना दिसत नाही.
रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आग्रहाची भूमिका घेण्याची गरज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. तसेच उठसुठ बांधकाम करणाऱ्यांवर व पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे.

 

 

Story img Loader