राज्यात सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा होत असताना विदर्भातील विविध जिल्ह्य़ांत स्वतंत्र विदर्भाची मागणी करीत विविध विदर्भवादी संघटनांनी ध्वजारोहण करून विदर्भ आंदोलनाचे रणशिंग फुकले. विदर्भवादी संघटनांनी महाराष्ट्र दिनी धरणे आंदोलन, निदर्शने आणि मिरवणूक काढून स्वतंत्र राज्याची मागणी करीत महाराष्ट्र दिनाचा निषेध केला.
स्वतंत्र विदर्भासाठी नव्याने स्थापन झालेल्या विदर्भ कनेक्ट (व्हीकॅन) या संस्थेतर्फे बजाजनगरातील विष्णू की रसोईमध्ये संस्थेचे अध्यक्ष मुकेश समर्थ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. व्हीकॅन द्वारा विदर्भ आंदोलनासाठी हा ५० फूट ध्वज उभारण्यात आला आहे. व्याघ्रभूमी म्हणून वाघाचे कातडे, खनिज संपदा दर्शविणारा काळा, वनसंपदेचा हिरवा रंग, मुबलक विजेचा सिम्बॉल, विदर्भाचा नकाशा अशा पद्धतीने हा ध्वज तयार करण्यात आला. विदर्भ राज्य किती सक्षम हे दाखविण्याचा प्रयत्न या ध्वजातून करण्यात आला आहे. ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर यावेळी स्वतंत्र विदर्भासाठी घोषणा देण्यात आल्या. महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील नेत्यांना या ध्वजापासून प्रेरणा मिळेल या उद्देशाने ध्वज लावण्यात आला आहे. विदर्भातील विविध जिल्ह्य़ात व्ही कॅन संस्थेतर्फे ध्वजारोहण करण्यात आले असून यापुढे वेगळ्या पद्धतीने आणि विदर्भाचे महत्त्व पटवून देत आंदोलन करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अॅड. मुकेश समर्थ यांनी सांगितले.
व्हीकॅन संस्थेमध्ये समाजातील साहित्य, सांस्कृतिक, व्यापार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. स्वतंत्र विदर्भाचे समर्थक अॅड. श्रीहरी अणे आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या पुढाकारातून ही संस्था स्थापन झाली आहे. ध्वजारोहण झाल्यानंतर विदर्भातील नेत्यांची छोटेखानी भाषणे झाली असून यापुढे सर्व विदर्भवादी नेत्यांनी आणि कार्यकत्यार्ंनी संघटित येऊन आंदोलन उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी दिनेश नायडू, माजी आमदार वामनराव चटप, विदर्भ इनकम टॅक्स असो. अध्यक्ष जे.पी. शर्मा, वेदचे विलास काळे, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अॅड. नीता सिंगलवार, अॅड. मिर्झा, देवेंद्र पारेख, राहुल उपगन्नलवार, अॅड. अनिल किल्लोर, बलवंतराव मेहता, उपेंद्र शेंडे, रामचंद्र वाघमारे, अरुण वनकर आदी विदर्भावादी नेते आणि समर्थक उपस्थित होते.
ध्वजारोहण झाल्यानंतर संस्थेच्या युवा विभागाचे प्रमुख अक्षय गोदामे यांच्या नेतृत्वात स्कूटर मिरवणूक काढण्यात आली. यावेळी व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी, महालातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. शहीद चौकातील विदर्भ चंडिका देवीजवळ आरती करण्यात आल्यानंतर फुटाळा तलावाजवळ मिरवणुकीचा समारोप झाला. व्हेरायटी चौकात विदर्भावादी नेत्यांनी रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे या भागातील वाहतूक काळ विस्कळीत झाली होती. या रस्ता रोकामध्ये किन्नरही सहभागी झाले होते.
विदर्भावादी नेत्यांची निदर्शने
महाराष्ट्र दिनानिमित्त कस्तुरचंद पार्क मैदानावर आयोजित करण्यात मुख्य शासकीय कार्यक्रमाच्यावेळी विदर्भ जॉइंट अॅक्शन कमिटीचे प्रमुख अहमद कादर यांनी प्रवेशद्वाराजवळ स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा देत महाराष्ट्र दिनाचा निषेध केला. पालकमंत्री शिवाजीराव मोघे कार्यक्रम स्थळी आल्यावर त्यांना मानवंदना स्वीकारल्यावर विदर्भावादी नेत्यांनी निदर्शने करून घोषणा देताच पोलिसांनी २० ते २५ विदर्भावादी नेत्यांना ताब्यात घेतले. यावेळी माजी आमदार भोला बढेल, तन्हा नागपुरी, कैलाश चरडे, राहुल थोरात, महादेव तुमाने, प्रभाकर कोंडबत्तनुवार, संजय कुकरेजा, शंकर भोले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.