रगतिशील महाराष्ट्राची उत्तर प्रदेशासोबत तुलनाच होऊ शकत नाही, तसेच ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’ सारखे कार्यक्रम दर दोन वर्षांत व्हावयास हवेत, असे मत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. एका विवाह समारंभासाठी नागपुरात आले असता ते रविभवनात पत्रकारांसोबत बोलत होते.
बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख खासदार मायावती काल नागपुरात येऊन गेल्या. त्यांनी महाराष्ट्रासंबंधी व्यक्त केलेल्या मतांशी असहमती व्यक्त केली. महाराष्ट्राला उत्तर प्रदेश बनविण्याची गरज नाही. मुळात प्रगतिशील महाराष्ट्राची उत्तर प्रदेशासोबत तुलनाच होऊ शकत नाही. महाराष्ट्रात सामाजिक न्यायाचे कार्य मोठय़ा प्रमाणात झाले आहे. महाराष्ट्राला महाराष्ट्रच राहू द्या, या शब्दात अशोक चव्हाण यांनी मायावतींना उत्तर दिले. विदर्भ विकासाबंधी विशेष प्रयत्न व्हायला हवेत. यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले, ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’ सारखे कार्यक्रम दर दोन वर्षांत व्हावयास हवेत. मुंबई व दिल्लीसारख्या महानगरात स्थानिक विकासासाठी उद्योजकांसह बैठकी घेतल्या जातात. विविध औद्योगिक कार्यावर चर्चा होते. त्याचप्रमाणे नागपुरातही विदर्भ विकासासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मिहानच्या सद्यस्थितीतबाबत माहिती नसल्याचे सांगून हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी विशेष प्रयत्न व्हायला हवेत, असे ते म्हणाले.
दुष्काळ ही राज्याची मोठी समस्या आहे. दुष्काळाबाबत राजकारण होता कामा नये. दुष्काळामुळे पाच महिन्यांनंतर अधिक गंभीर परिस्थिती निर्माण होईल. त्यास तोंड देण्यासाठी तयार रहावे लागेल. दुष्काळग्रस्त भागात निधीचे योग्य नियोजन झाले पाहिजे. दुष्काळासंदर्भात प्रादेशिक समतोलवाद आड येता कामा नये. विरोधी पक्षाला सकारात्मक भूमिका घ्यावी लागेल, याकडे अशोक चव्हाण यांनी लक्ष वेधले. काँग्रेस कार्यकर्ते आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत. अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ घेतील. युतीबाबतही चर्चा होत आहे. हायकमांडचा निर्णय सर्वमान्य असतो. लोकसभा निवडणुकीची तयारीही केली जात आहे. काही पर्यवेक्षक येऊन गेले. प्रत्येक मतदारसंघाचे निरीक्षण केले जात आहे, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांची खुर्ची काटेरी असते. पहिले सहा महिने मधुचंद्रासारखे असतात. त्यानंतर आव्हाने उभे होऊ लागतात. चांगल्या कामानंतरही मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्न उठतात. असे असले तरी राज्यात विद्यमान मुक्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चांगले काम करीत असल्याची पुस्तीही अशोक चव्हाण यांनी जोडली.

Story img Loader