अमरावती जिल्ह्यातील वरूड येथे येत्या २८ फेब्रुवारी व १ मार्चला १५ वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात राज्यातील पक्षीनिरीक्षकही सहभागी होणार आहेत. विदर्भात विभागीय स्तरावरील पक्षीमित्र संमेलनाची परंपरा दिवं. रमेश लाडखेडकर यांच्या पुढाकारातून सातत्याने चालत आली आहे. विदर्भात आजपर्यंत नागपूर, भंडारा, अमरावती, नागपूर, नवेगाव बांध, मेंढालेखा (गडचिरोली), कारंजा (लाड), जुनोना (चंद्रपूर), वर्धा व नागपूर (मोहगाव झिल्पी), पांढरकवडा, अकोला, गोंदिया येथे ही संमेलने झाली.
पक्षीनिरीक्षण या छंदातून पर्यावरण संरक्षकांची पिढी निर्माण होत असते, पण हा छंद अजूनही प्रत्येग गावांमध्ये, शहरांमध्ये बोटावर मोजण्याइतपत व्यक्तीपर्यंतच मर्यादित राहिला असून संशोधन व संवर्धन नगण्य आहे. म्हणून यावर्षीच्या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना ‘पक्षी अधिवास संशोधन व संरक्षण’ अशी निश्चित करण्यात आली आहे. या संकल्पनेंतर्गत संशोधन, संवर्धन, लेखन, पक्षीनिरीक्षण छंदाचा प्रसार व जनजागृती यावर चर्चा व सादरीकरण केल्ेा जाणार आहे. संमेलनादरम्यान पक्षीजीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. विदर्भ तसेच महाराष्ट्रातील पक्षीनिरीक्षकांचा सहभाग यात असणार आहे. संमेलनाच्या मध्यवर्ती संकल्पनेंतर्गत पक्षी जैवविविधता संशोधन व संरक्षण, पक्षी अधिवास संवर्धन, पक्षी विषयावरील लेखन, वनस्पती-पक्षी संजीवन संशोधन, पक्षी निरीक्षण छंदाचा प्रचार व प्रसार हे उपविषय आहेत.
महाराष्ट्र पक्षीमित्र चळवळीने त्यांच्या वाटचालीचे पावशतक पूर्ण केले आहे. आजपर्यंत २८ महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलने यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले आहेत. प्रादेशिक पातळीवरील संमेलने आयोजित करण्यात संपूर्ण महाराष्ट्रात विदर्भ आघाडीवर आहे. १५वे विदर्भ पक्षीमित्र संमेलनाकरिता वरुड येथील नेचर फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. वरूड येथील महात्मा फुले कला, वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय, जायंटस् ग्रुप ऑफ वरूड, वनपरिक्षेत्र कार्यालय तसेच पहाट पक्षी मित्र मंडळ यांचे या संमेलनाला सहकार्य आहे.
वरूड तालुक्यातील गव्हाणकुंड येथील श्री कपिलेश्वर मंदिरात आयोजित संमेलनाचे उद्घाटन शनिवारी, २८ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. ज्येष्ठ पक्षीनिरीक्षक डॉ. मनोहर खोडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित संमेलनांतर्गत दुपारी १.३० ते ४ वाजेपर्यंत तांत्रिक सत्राअंतर्गत पक्ष्यांवरील सादरीकरणाकरिता ३०-३० मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. दुपारी ४ वाजता छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून दुपारी ४.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पुन्हा तांत्रिक सत्रांतर्गत पक्ष्यांवरील सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे. याकरिता १०-१० मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. रविवारी, १ मार्चला सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत शेखदरी धरण व शेखदरी जंगल येथे पक्षी निरीक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. सकाळी १० वाजता तांत्रिक सत्रांतर्गत पक्ष्यांवरील सादरीकरणासाठी ३०-३० मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. दुपारी १.३० वाजता संमेलनाचा समारोप करण्यात येईल.

Story img Loader