लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन दोन दिवस झाल्यानंतर विदर्भात महायुतीने बहुतेक जागांवर उमेदवार निश्चित केले असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पक्षासह इतर राजकीय पक्षांनी उमेदवार घोषित न केल्याने विदर्भातील राजकीय चित्र अजूनही अस्पष्ट आहे.
भारतीय जनता पक्ष-शिवसेना आणि रिपब्लिकन यांच्या महायुतीमध्ये राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष सहभागी झाल्यानंतर महायुतीने जााहीर सभा घेत जोरदार तयारी सुरू केली. महायुतीने विदर्भातील बहुतेक जागेवर उमेदवार निश्चित केल्यानंतर त्यांचा प्रचार सुरू झाला असला तरी काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन समाज पक्षासह इतरही राजकीय पक्षांनी मात्र उमेदवार निश्चित केले नसल्यामुळे विदर्भातील राजकीय चित्र अजूनही स्पष्ट झालेले नाही.
आम आदमी पक्षाने नागपूर, गोंदिया-भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर या ठिकाणी उमेदवार घोषित केले असले तरी अन्य ठिकाणी मात्र त्यांनी पत्ते उघड केलेले नाहीत. महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे उमेदवार कोण राहील याबाबत अजूनही काही निश्चित नाही. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनसेजवळ सक्षम कार्यकत्यार्ंची कमतरता आहे. शहर अध्यक्ष प्रवीण बरडे, हेमंत गडकरी आणि प्रशांत पवार हे तीन पदाधिकारी आहेत. त्यापैकी बरडे यांनी विधानसभा निवडणूक लढविली असून त्यांनी शिवसेनेचे उमेदवार म्हणून काँग्रेसला चांगलीच लढत दिली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये विदर्भात काही जागाबाबत अजूनही वाटाघाटी सुरू आहे. रामटेकवर मुकूल वासनिक आणि नागपूरमधून विलास मुत्तेमवार यांच्या नावांची चर्चा आहे. ग्रामीण काँग्रेसने वासनिकांचे नाव समोर केले असून शहर काँग्रेसने मुत्तेमवार यांचे नाव समोर केले आहे. मात्र, अजूनही दोघांचीही नावे घोषित झालेली नाहीत. भाजपचे नेते नितीन गडकरी यांची नागपूरमधून उमेदवारी घोषित झाली असून त्यांच्या विरोधात आम आदमी पक्षाने अंजली दमानिया यांना उभे केले आहे. दोन्ही उमेदवारांनी शहरात प्रचार सुरू केला आहे. बहुजन समाज पक्षातर्फे गेल्यावर्षी भाजपमधून बाहेर पडलेल्या माणिकराव वैद्य यांना उमेदवारी दिली असताना त्यांनी दीड लाखाच्यावर मते घेतली होती. मात्र, यावेळी बहुजन समाज पक्षाला सक्षम उमेदवार मिळत नसल्यामुळे त्यांनी उमेदवार कोण राहील हे स्पष्ट केले नाही. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा. जोगेंद्र कवाडे आणि एकीकृत रिपब्लिकन पक्षाच्या माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांनी अजूनही पत्ते उघड केले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने भंडारा-गोंदिया, बुलढाणा आणि अमरावतीमधील उमेदवार घोषित केले असले तरी काँग्रेसने मात्र विदर्भातील एकही उमेदवार घोषित न केल्याने कार्यकर्त्यां द्विधा मनस्थितीत आहे. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीने वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करण्याची एकही संधी सोडली नव्हती. निवडणूक तारखा जाहीर होण्याच्या दिवशी दक्षिण नागपुरातील आमदारांनी शहरातील रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
एकीकडे राजकीय पातळीवर विशेष हालचाली होत नसताना दुसरीकडे मात्र प्रशासनाने निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. आचारसंहिता जाहीर होताच महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या गाडय़ा परत घेतल्या. शहरातील होर्डिग आणि पोस्टर हटविण्याचे आदेश दिले. राजकीय नेत्यांचे फलक काढण्यात आले. एका सामाजिक संघटनेने मतदान करण्यासंदर्भात जागृती करण्यासाठी शहरातील विविध भागात होडिर्ंग लावले होते. त्यावर विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांची छायाचित्रे होती त्यामुळे ते होर्डिग सुद्धा काढण्याचे आदेश प्रशासनाने दिले. लवकरच विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांची जिल्हाधिकारी बैठक घेणार असून त्यात निवडणूक कार्यक्रम, खर्चाची मर्यादा आणि मतदार यादीबाबत सूचना करणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा